अक्कलकोटमध्ये दहा दिवसांत १२ वाहने पकडून ठोठावला २७ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:20+5:302021-09-04T04:27:20+5:30
अक्कलकोट : अवैध वाळू वाहतूक करणारी १२ वाहने दहा दिवसांत पकडून ३४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली ...
अक्कलकोट : अवैध वाळू वाहतूक करणारी १२ वाहने दहा दिवसांत पकडून ३४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत जवळपास २७ लाख २४ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. काही महिन्यांपासून तालुक्यात वाळू वाहतुकीचा उपद्रव वाढला होता. दरम्यान, अक्कलकोटचे प्रभारी तहसीलदार शिरसट यांनी पदभार घेताच अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
या कारवाईत नसरोद्दीन इंडिकर (रा. इंडी, जिल्हा विजयपूर) यांचा विना नंबर टेम्पो पकडून १ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा दंड आकारला आहे. बसवेश्वर बिराजदार (रा. म्हैसलगे, ता. अक्कलकोट) यांचे हायवा वाहन, सलीम बिराजदार (रा. अक्कलकोट), दर्शनकुमार वाघमारे (रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर), श्रीशैल माने (रा.घुंगरेगाव, ता.अक्कलकोट), शोएब मुतवल्ली (रा.अक्कलकोट), दशरथ बनसोडे (रा. कडबगाव, ता. अक्कलकोट), लक्ष्मण उमदी (रा. कोर्सेगाव, ता.अक्कलकोट), महंमद शेखर (रा. मनूर, ता. इंडी कर्नाटक) यांची वाहने पकडली आहेत, तसेच इतर तीन वाहने पकडली असून त्यांच्या मालकांची नावे निष्पन्न झालेली नाहीत. याबाबत महसूल विभागाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र दिले असून, त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदारांनी सांगितले. संबंधित वाहन मालकांना शासकीय नियमाप्रमाणे दंड आकारून भरण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. त्यापैकी एकाने दंड भरला आहे. एकूण २७ लाख २४ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
---
अवैध वाळू वाहतुकीविरोधात फिरती, स्थिर पथके नेमली आहेत. अचानकपणे धाडी टाकून गुड्डेवाडी, खानापूर, तडवळ या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. यापुढे कारवाईत सातत्यता राहणार आहे.
- बाळासाहेब शिरसट
तहसीलदार, अक्कलकोट