अक्कलकोट बसस्थानक जीर्ण, बीओटी तत्त्वावर दिल्यास रूप पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:27 AM2021-09-07T04:27:38+5:302021-09-07T04:27:38+5:30
अक्कलकोट बसस्थानकाची इमारत अत्यंत जुनी आहे. पूर्णपणे जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात बसस्थानक पूर्णपणे गळते. स्थानकातील खांब तुटले आहेत. त्यामुळे ...
अक्कलकोट बसस्थानकाची इमारत अत्यंत जुनी आहे. पूर्णपणे जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात बसस्थानक पूर्णपणे गळते. स्थानकातील खांब तुटले आहेत. त्यामुळे बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. याची दखल घेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरामधून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे बसस्थानकावर सतत गर्दी असते. सध्याचे बसस्थानक जुने असून, त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. यामुळे भक्तांची व स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना युती शासनाकडून सदर बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर झालेले आहे. परंतु निधीअभावी सदरचे काम सुरू होण्यास विलंब होत आहे.
.............
अक्कलकोट हे महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी बसस्थानकाचे रूप बदलणे गरजेचे आहे. म्हणून बीओटी तत्त्वावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी मंजुरी द्यावी. त्यातून बसस्थानकाचे चित्र बदलेल.
- आमदार सचिन कल्याणशेट्टी
......
फोटो ओळी
अक्कलकोट बसस्थानकाचे रूप पालटण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.
............
(फोटो ०६अक्कलकोट एसटी)