अक्कलकोट, दुधनीत नवीन तुरीची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:48+5:302020-12-25T04:18:48+5:30
अक्कलकोट तालुक्यासह शेजारील कर्नाटक राज्यातून तूर येत आहे. सध्या प्रतिक्विंटलला सरासरी ६ हजारांपेक्षा अधिक एक नंबर तुरीला दर मिळत ...
अक्कलकोट तालुक्यासह शेजारील कर्नाटक राज्यातून तूर येत आहे. सध्या प्रतिक्विंटलला सरासरी ६ हजारांपेक्षा अधिक एक नंबर तुरीला दर मिळत आहे. तालुक्यात यंदा अतिवृष्टी, महापुरामुळे उच्चप्रतीच्या जमिनीवरील तूर पीक सर्रासपणे शेतकऱ्यांच्या हातून गेले. माळरानवरील तुरीने यंदा कधी नव्हे साथ दिली आहे. एकरी चांगला उतारा निघत आहे. शेजारील तालुक्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
गुरुवारी अक्कलकोट बाजार समितीत अचानकपणे तुरीचे दर प्रतिक्विंटल ६ हजारांपेक्षा अधिक झाले. यामुळे आवक वाढून रात्री उशिरापर्यंत आडत्याकडे तूर येत होती. तरीही शेतकऱ्यांनी एक आठवडाभर थांबून खरेदी केंद्रावर तूर विक्री करणे फायदेशीर आहे. असे मत काही शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले.
अक्कलकोट बाजार समितीत दक्षिण तालुका, उत्तर तालुका, मंगळवेढा, उमरगा, तुळजापूर, कर्नाटकातील आळंद, इंडी, आदी भागातून तूर विक्रीसाठी शेतकरी आणतात, अशी माहिती प्रसिद्ध आडत व्यापारी महादेव डोंगरे यांनी दिली.
दुधनीत दर उच्चांक
दुधनी बाजार समितीत अक्कलकोट तालुक्यातील काही भागातून, आळंद, मुरूम, तुळजापूर आदी भागातून मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी येते. गुरुवारी दिवसभरात प्रतिक्विंटल ५ हजार ९०० ते ६ हजार ४०० रुपये दर निघाला. आठ दिवसात ८ ते १० हजार क्विंटल तुरीचे आवक आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव स्थावरमठ यांनी दिली.
फोटोओळ:- अक्कलकोट आडत बाजारामध्ये तुरीचे सौदे पुकारताना व्यापारी स्वामीनाथ नागुरे, राजशेखर हिप्परगी, महादेव डोंगरे, बसवराज घिवारे, शिवप्पा कुंभार आदी.