Good News; कोरोनाग्रस्त अक्कलकोट, माळशिरस तालुके पुन्हा सेफ झोनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:09 PM2020-06-09T12:09:42+5:302020-06-09T12:12:09+5:30
कोरोना योद्ध्यांचे प्रयत्न फळाला; नागरिकांची सतर्कता अन् प्रशासनाच्या दक्षतेने झाले शक्य; बार्शीत बारा जणांचे अहवाल निगेटिव्ह
सोलापूर : जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे लोण पसरलेले असताना सुरुवातीचे दोन महिने अक्कलकोट आणि माळशिरस हे दोन्ही तालुके सेफ झोनमध्ये होते. मे महिन्यात चपळगावच्या रुपाने अक्कलकोट तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला. इकडे माळशिरस तालुक्यातील अकलूजला वैरागच्या व्यापाºयाच्या रुपाने येथेही कोरोनाने शिरकाव केला. मात्र अल्पावधीतच आज मितीला हे दोन्ही तालुका पुन्हा सेफ झोनमध्ये आल्यामुळे दोन्ही तालुक्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी पुन्हा कोरोनाचा प्रवेश होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
अक्कलकोट तालुक्यात एकूण २३० नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी ८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघालेले होते. एकाचा मृत्यू झाला. उर्वरित ७ जणांवर आरोग्य विभागाने चांगल्या प्रकारे उपचार केल्याने ते सर्व निगेटिव्ह आले. त्या सर्वांना सोमवारी फुलांचा वर्षाव करीत घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता अक्कलकोट तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून सुरुवातीला दोन महिने तालुका सुरक्षित राहिला होता. सोलापुरात रुग्ण संख्या वाढत असताना प्रथम चप्पळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टराचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह निघाला़ त्यांच्या संपर्कातील ७८ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते सर्व निगेटिव्ह आले़ तसेच उपजिल्हाधिकारी अक्कलकोट दौºयावर येऊन गेले तेव्हा पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांच्या संपर्कातील १३, बुधवार पेठ येथील एका महिला पोलिसाच्या संपर्कातील ९, हंजगी येथे पहाटेच्या वेळी गुपचूपपणे विवाह केला होता. त्यामधील ५, अक्कलकोट शहरातील एका व्यापाºयाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील १०९ असे तब्बल २३० जणांचे स्वॅब घेण्यात आलेले होते. यापैकी केवळ ७ जण पॉझिटिव्ह आढळले़ उर्वरित सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले़ पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये १० दिवस उपचार करून कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने सोमवारी त्या सर्वांवर फुलांचा वर्षाव करीत घरी सोडण्यात आले.
यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ़ अशोक राठोड, डॉ. एस. एस. मेंथे, डॉ. निरंजन जाधव, डॉ. निखिल क्षीरसागर, डॉ. गजानन माडकर, डॉ़ प्रवीण शिंदे, आरोग्य सहायक सोनबा भास्कर, आरोग्यसेवक इसाक काझी, एस. एस. शेरीकर यांनी त्यांच्यावर उपचार केले.
दरम्यान, शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी आशा राऊत, गटविकास अधिकारी कोळी, सहा़ गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ़ संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, कृषी विभागाचे वडखेलकर, गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी सिंघल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी त्यांना सहकार्य केले़ त्यामुळे अखेर तालुका कोरोनामुक्त झाला.