अक्कलकोट रोड, मोहोळ रेल्वे स्थानकाचाही कायापालट होणार; खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
By Appasaheb.patil | Published: August 10, 2023 08:06 PM2023-08-10T20:06:06+5:302023-08-10T20:06:38+5:30
अमृत भारत स्थानक योजनेची संकल्पना रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी आणि आवश्यक सुविधांना चालना देण्यासाठी लागू केली आहे.
सोलापूर : अमृत भारत रेल्वे स्थानक दर्जा देत तेथील पायाभूत सुविधांचा विकास करण्याकरिता केंद्र सरकारच्या वतीने सुमारे ५० कोटी रुपयांच्या विकासकामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. परंतु योजनेअंतर्गत अक्कलकोट रेल्वे स्थानक व मोहोळ रेल्वे स्थानकाचा समावेश करून स्थानकाचा कायापालट करावा, अशी मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. निवेदन दिल्यानंतर मंत्र्यांनी ‘हो जाएगा’ असे उत्तर दिले.
अमृत भारत स्थानक योजनेची संकल्पना रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी आणि आवश्यक सुविधांना चालना देण्यासाठी लागू केली आहे. या योजनेंतर्गत सोलापूर, दुधनी, पंढरपूर, कुर्डूवाडी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे १४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर रकमेतून सोलापूर, दुधनी, कुर्डूवाडी रेल्वे स्थानकाचा विकास करून प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परंतु अक्कलकोट रोड व मोहोळ रेल्वे स्थानकाचा समावेश या योजनेत केला नाही. त्यामुळे याही दोन स्थानकांचाही योजनेत समावेश करण्याची मागणी खासदारांनी केली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले.