Solapur: गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:20 IST2025-04-11T12:14:56+5:302025-04-11T12:20:38+5:30

Solapur Murder: सोलापुरात मुलाने प्रेयसीसोबत मिळून आईची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.

Akkalkot Son kills mother for being an obstacle in love relationship | Solapur: गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं

Solapur: गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं

Solapur Crime: गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरणातून गुन्हेगारी घटना घडण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातून प्रेमप्रकरणातून हत्याकांड घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच सोलापुरात प्रेमप्रकरणातून मुलानेच जन्मदात्या आईचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईला मुलाने एका महिलेसह मिळून ठार मारलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे मुलानेच जन्मदात्या आईचा साडीने गळा आवळून खून केला. ही घटना गुरुवार, १० एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता घडली. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भीमबाई हणमंत कळसगोंड (वय ४८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी रमेश हणमंत कळसगोंडचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. भीमबाई कळसगोंड यांना मुलाचे हे संबंध मान्य नव्हते आणि त्यांचा या नात्याला विरोध होता.

भीमबाई सातत्याने मुलगा रमेशच्या नात्याला विरोध करत होत्या. त्यामुळे त्यांचे मुलासोबत सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे रमेश आणि त्याच्या प्रेयसी महिलेने भीमबाई हणमंत कळसगोंड यांना कायमचे बाजूला करण्याचा निर्णय घेतला. १० एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता आरोपी मुलाने प्रेयसीसोबत संगनमत करून आईला तिच्याच अंगावरील साडीच्या पदराने गळा आवळून ठार मारले. ही घटना संगप्पा गणपती उजनी यांच्या शेताजवळ घडली.

घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत मयत भीमबाई यांचे पती हणमंत भागप्पा कळसगोंड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगा व त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सरवसे करत आहेत.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात किरकोळ वादातून दारुड्या पतीने पत्नीची हत्या करून स्वतःला संपवल्याची घटना घडली होती. सोनाबाई वसंत पवार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पती वसंतला दारुचे व्यसन होते. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. मंगळवारी वाद झाल्यानंतर वसंत पवारने सोनाबाई यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. वसंत पवार तिथून पळून गेले. त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळील एका झाडाला गळफास लावून वसंत पवारने आत्महत्या केली.
 

Web Title: Akkalkot Son kills mother for being an obstacle in love relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.