अक्कलकोट तीर्थक्षेत्र ही देवभूमी : बाबा रामदेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 05:48 PM2018-03-17T17:48:33+5:302018-03-17T17:48:33+5:30
अक्कलकोट येथील फत्तेसिंह मैदानावर शनिवारी पहाटेपासून पंतजली योगपीठाच्यावतीने तीन दिवसीय योग्य चिकित्सा ध्यान शिबीराला प्रारंभ
अक्कलकोट : अक्कलकोट ही नगरी देवभूमी आहे़ या देशभूमीत जन्मण्याचे भाग्य तुम्हा सर्वांना लाभले आहे़ या देवभूमीवर जन्मलेल्या देशभक्तांनो, आपले कर्म-धर्म योग्य ठेवा, योग-प्राणायमातून स्वत:चे आयुष्य आणि देश घडवा, परमेश्वराने घालून दिलेल्या संस्काराची परंपरा कायम ठेवा असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले़
अक्कलकोट येथील फत्तेसिंह मैदानावर शनिवारी पहाटेपासून पंतजली योगपीठाच्यावतीने तीन दिवसीय योग्य चिकित्सा ध्यान शिबीराला प्रारंभ झाला़ यावेळी ते बोलत होते़ उदघाटन समारंभ कार्यक्रमास श़ ब्ऱ डॉ़ जयसिध्देश्वर महास्वामी, म़ नि़ ष्ऱ बसवलिंग महास्वामी, शिवपुरी संस्थानचे डॉ़ पुरूषोत्तम राजीमवाले, सहकारमंत्री सुभाष देशमुख, लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा योग शिबीराचे आयोजक सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते़ पहाटेच्या रम्य वातावरणात बासरीच्यसा मंजूळ स्वरानंदाच्या चैतन्यमयी वातावरणात दिपप्रज्वलनाने शिबीराचे उदघाटन झाले़
योग प्रात्याक्षिके आणि ध्यान साधनेदरम्यान योगगुरू बाबा रामदेव यांनी करा योग-रहो निरोग चा नारा देत स्वदेशी वापराचा मंत्र दिला़ योग आणि प्राणायमाची महती सांगताना ते म्हणाले की, प्राणायम हा रोगमुक्ती, व्यसनमुक्ती आणि समृध्दीचा मार्ग आहे़ व्यसन आणि दुराचारापासून दूर रहायचे असे तर योगीमुनींनी सांगितलेल्या आणि ग्रंथातून गौरविलेल्या योगाचा मार्ग सर्वांनी निवडावा़
स्वदेशीचा वापर करण्याचा मंत्रही बाबा रामदेव यांनी दिला .
भारतात इंग्रज आले मात्र त्याची सुरूवात इस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून झाली़ आम्हा भारतीयांची पहिली लढाई इंग्रजांशी नव्हे तर इस्ट इंडिया कंपनीशी झाली़ एक लाखावर भारतीय या लढ्यात मारले गेले़ स्वातंत्र्य मिळाले़ आता तरी विदेशीच्या मार्गाने जावू नका, स्वदेशी वस्तु वापरा, आपले शरीर ही ईश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे़ केमिकलयुक्त वस्तु आणि खाद्यपदार्थाचा वापर करून आपल्या शरीराची हानी करू नका, त्याऐवजी पूर्णत: आयुवैदिक असलेले पतंजलीची उत्पादने वापरा असे आवाहन त्यांनी केले़
तब्बल अडीच तास चाललेल्या पहिल्या दिवसाच्या योग शिबीरात त्यांनी प्राणायम, कपालभाती, विलोभ, सुर्यनमस्कार, विविध आसनांचे प्रात्याक्षिक उपस्थित जनसमुदायाकडून करून घेतले़ योग आणि व्यायामाचे फायदे सांगत कसलेही औषध न घेता केवळ योग-प्राणायम करून फुकटात स्वत:चे आरोग्य सुधारण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला़
शिबीराच्या उदघाटनाप्रसंगी बोलताना डॉ़ जयसिध्देश्वर महास्वामी म्हणाले की, ज्या ठिकाणी रूषी जातात ती देवभूमी बनते़ योगगुरू बाबा रामदेव यांना आम्ही पतंजली रूषीच्या स्वरूपात पाहतो़ त्यांच्या आगमनाामुळे श्री स्वामी समर्थांची ही नगरी पावन झाल्याचे गौरवोउदगार त्यांनी काढले़ योगगुरूच्या प्रयत्नांमुळेच भारत निरोगी आणि बलशाली होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला़
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, सचिन कल्याणशेट्टींचे वडील पंचप्पा कल्याणशेट्टी आणि सुधाताई अळ्ळीमोरे यांनी दहा वर्षापूर्वी योगगुरू बाबा रामदेव यांना अक्कलकोट येथे शिबीर घेण्याची विनंती केली होती़ ती आज पूर्ण झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले़ सोलापूरातील विडी आणि वस्त्रोउद्योग अडचणीत आहे़ त्यामुळे आपणही अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे विनंती करीत होतो़ आता बाबांनी येथे येऊन टेक्सटाईल्स उद्योगात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले़ त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाचे चित्र पालटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, योगगुरूच्या येण्यामुळे या तालुक्याचा मान वाढला आहे़ समाजाला ज्याची गरज आहे ते देण्यासाठी बाबा येथे आले़ या शिबीराचे आयोजन करण्याची संधी आपणास मिळाली हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली़
आमचा नववर्ष गुढीपाडवा
पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करीत आम्ही भारतीय आणि हिंदु माणसे स्वत:च्या नववर्षाचा दिवसही विसलो आहोत़ हिंदु संस्कृती ही महान आहे़ म्हणूनच तिच्यावर आघात होवूनही ती टिकून आहे़ हिंदु संस्कृतीचा नववर्षदिन गुढीपाडवा आहे़ त्यामुळे या दिवसाची निवड करून सोलापूरात महिला शिबीर होत आहे़ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचया पुढाकाराने सोलापूरात गुढीपाडव्याला होणारे शिबीर हिंदु संस्कृतीचा गौरव करणारे ठरेल असाही उल्लेख बाबा रामदेव यांनी केला़
योगशिबीराने अक्कलकोट मध्ये गाठला गर्दीचा उच्चांक
बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या योग चिकित्सा शिबीरामुळे अक्कलकोटमध्ये अगदी पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक गाठला़ खुद्द बाबा रामदेव यांनीही या शिबीरातीला अभुतपूर्व गर्दीचे कौतुक केले़ पहाटे ५ वाजतापासून शिबीर सुरू होणार असले तरी तीन वाजल्यापासून नागरिकांचे लोंढे शिबीरास्थळी येताना दिसत होते़ पुरूषांएवढीच महिलांची लक्षणीय उपस्थिती होती़ केवळ अक्कलकोट तालुक्यातूनच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातून आणि लगतच्या कर्नाटक, इंडी, अफजलपूर, आळंद, गुलबर्गा, विजयपूर येथील कन्नड भाषिक लोकही यात मोठया संख्येने सहभागी झाले होते़ स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे आधीच गर्दीत बुडालेल्या या शहराला या शिबीरामुळे जत्रेचे स्वरूप आले होते़
लॉज आणि भक्तनिवास हाऊसफुल्ल
स्वामी समर्थांचा प्रगटदिन असलेल्या गुढीपाडव्याचा मुर्हुत साधून योगगुरू बाबा रामदेव यांचे त्रिदिवसीय शिबीर अक्कलकोट नगरीत सुरू झाले़ या दुग्धशर्करा योगाच्या अनुभूतीसाठी बाहेरगावाहून हजारो शिबीरार्थी सहकुटुंब दाखल झाले आहेत़ त्यामुळे येथील सर्वच लॉज, भक्तनिवास, यात्रीनिवास हाऊसफुल्ल झाले आहेत़ अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी महाराज मंदीराच्या २३३ खोल्या, शिवप्रिय संस्थानच्या २८ खोल्यांसह खासगी लॉजेसही मोठया प्रमाणात आहेत़ या सर्वच ठिकाणी शिबीरार्थी पहिल्या दिवसापासूनच मुक्कामी झाले आहेत़ अनेकांनी आपल्या परिचयातील व्यक्तीकडे आश्रम घेतला आहे़