केवळ वेळेवर उपचाराअभावी अक्कलकोटच्या व्यापाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:35+5:302021-04-17T04:21:35+5:30
झाले असे की, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील एका प्रसिद्ध स्टेशनरी व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली ...
झाले असे की, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील एका प्रसिद्ध स्टेशनरी व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. शिवाय समाजात मान-सन्मानही होता. राजकीय नेत्यांशी चांगले संबंधही होते. परंतु व्यापारी असल्याने ग्राहकांशी संपर्क आला आणि त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांना लागलीच सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन उपचार घ्यायचे होते. पण सोलापुरातील बऱ्याच हॉस्पिटलमध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून बेड उपलब्ध होईल का याची चौकशी केली.
दरम्यान २४ तास उलटले तरी बेड मिळाला नाही. अखेर अश्विनी हॉस्पिटलमधून एका ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला. येथील एक व्यक्ती पुण्याला उपचारासाठी जाणार आहे. त्यांचा बेड रिकामा होईल. लागलीच त्यांनी अश्विनी हॉस्पिटल गाठले. तोपर्यंत मध्यरात्रीची वेळ होती. डाॅक्टरांअभावी वेळेत उपचार झाले नाहीत. सकाळी डॉक्टर आल्यानंतर उपचार सुरू केले. परंतु वेळ निघून गेली होती. वेळेवर उपचार झाले नाही. अखेर त्यांना मृत्यूने कवटाळले. एका व्यापाऱ्याचा मृत्यू केवळ उपचाराअभावी झाला. अशी परिस्थिती व्यापाऱ्याची असेल तर सर्वसामान्यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण होतो.
विविध क्षेत्रातील व्यक्ती कोरोना बाधित
अक्कलकोट एस टी डेपोमध्ये कार्यरत असलेल्या दोन चालकास शासन आदेशानुसार मुंबई सिटीबस येथे १५ दिवसांसाठी ड्युटी दिली. दरम्यान ते दोघे पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा वेगवेगळ्या दिवशी मृत्यू झाला. तसेच एका वाहकाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून सोलापूर येथे उपचार सुरू आहे. केवळ मुंबई येथे ड्युटी लावल्यामुळेच आमची माणसं गेल्याची संतप्त भावना संघटनेच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली. झेडपीचे १० शिक्षक पॉझिटिव्ह निघाले, पैकी काहीजण बरे झाले आहेत, तर काहींवर उपचार सुरू आहेत. अक्कलकोट महाविद्यालयातील चौघांना कोरोना झाला. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. येथील न्यायालतील तीन वकील पॉझिटिव्ह असून उपचार सुरू आहेत. ग्रामीण रुग्णालयातील एक डॉक्टरच पॉझिटिव्ह असून आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या पत्नी व मुलाचा रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आला आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती बाधित होत आहेत.