दहा दिवसांपासून अक्कलकोटचा पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:21 AM2021-05-14T04:21:58+5:302021-05-14T04:21:58+5:30
नगरपालिकेकडून पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रकार जुना आहे. मात्र सध्या ऐन सणासुदीच्या काळात हा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप ...
नगरपालिकेकडून पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रकार जुना आहे. मात्र सध्या ऐन सणासुदीच्या काळात हा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे कुरनूर, सांगवी, हिळळी, हालचिंचोळी अशा एकूण चार योजना आहे. त्यापैकी केवळ कुरनूर योजनेतून पाणी उपसा सुरू आहे. सांगवी योजना जुजबी सुरू आहे. उर्वरित बंद आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील ५ हजार २०० ग्राहकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम नगरपालिकाकडून होत आहे. यामुळे शहरातील ५० हजार लोकांचे ओरड सुरू आहे. याबाबत म्हाडा कॉलनी, उत्कर्ष नगर खासबाग, एवन चौक, आझाद गल्ली, सुभाष गल्ली, फत्तेसिंह चौक, माळी गल्ली आदी भागातून नागरिकांनी नगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. सध्या रमजान, बसव जयंती अक्षय तृतीया अशा सणासुदीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या दहा दिवसांपासून बंद आहे. धरणात पाणीसाठा मुबलक असतानाही केवळ नियोजनअभावी विस्कळीत होत आहे. एकंदरीत धरण उशाला, कोरडा घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
----
अनेक वर्षांपासून कुरनूर योजनेतून पाणी उपसा करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र डीपी, लाईन ओढून घ्यावी, असे पत्र एमएसईबीकडून दिले आहे. यावर आजवर नगरपालिकाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही. म्हणून वादळी वाऱ्याने वारंवार वीज खंडित होऊन पाणी उपसा व पुरवठा विस्कळीत होत आहे. यावर आजवर नगरपालिकेने गांभीर्याने विचार केलेले नाही, असा आरोप शहरवासीयांमधून होत आहे.
---
वादळी वाऱ्याने कुरनूर येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पाणी उपसा विस्कळीत झाला आहे. त्यासाठी नवीन लाईन ओढण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर आहे. त्याची नगरपालिकेडून कार्यवाही पूर्ण झाली आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सतत सुरळीत राहण्यास मदत होईल.
- एम. डी. शेख, पाणीपुरवठा अभियंता,नगरपालिका
----
म्हाडा काॅलनीत तब्बल ११ दिवसांनंतरही पाणीपुरवठा नाही. त्यामुळे येथील नागरिकांमधून नगरपरिषदेच्या प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुबलक पाणी असून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. प्रशासनाधिकाऱ्यांना विचारले असता लाईट नाही, पाणी टँकर नाही, तुमचे तुम्ही बघून घ्या अशी उडवाउडवीची उत्तरे देतात.
- मलकप्पा भरमशेट्टी, अध्यक्ष, म्हाडा काॅलनी
----