संगम येथे अवैध वाळू चोरांवर अकलूज पोलिंसाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:20 AM2021-05-15T04:20:40+5:302021-05-15T04:20:40+5:30
श्रीपूर : माळशिरस तालुक्यात जांबूळबेट संगम येथे निरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू चोरावर अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या ...
श्रीपूर : माळशिरस तालुक्यात जांबूळबेट संगम येथे निरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू चोरावर अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सुगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार पोलीस हवालदार रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, मंगेश पवार, विक्रम घाटगे, पोलीस नायक नीलेश काशीद हे मोटारसायकलवरून जांभूळबेट संगम येथे गस्त घालत होते. दरम्यान, निरा नदी पात्रात गेले असता अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.
मुरलीधर दत्तात्रय शिंदे (रा गिरवी, ता. इंदापूर), देवीदास बाळू जाधव (रा. तांबवे, ता. माळशिरस), अमोल पोपट क्षीरसागर, हर्षवर्धन पांडुरंग क्षीरसागर, तुकाराम पांडुरंड क्षीरसागर (सर्व रा. गिरवी, ता. इंदापूर, जि.पुणे) हे पाच जण जेसीबी मशीनच्या साहाय्याने विनापरवाना वाळू उपसा करताना निदर्शनास आले. या कारवाईत ट्रॅक्टर आणि रिकामा डम्पिंग ट्राॅली जप्त करण्यात आली आहे. नीलेश काशीद यांनी अकलूज पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सुहास क्षीरसागर करीत आहेत.