अकलूजने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी द्यावी; शेकापचे जयंत पाटील म्हणाले...
By राकेश कदम | Published: March 17, 2024 04:45 PM2024-03-17T16:45:49+5:302024-03-17T16:47:00+5:30
आम्ही केवळ विजयदादांनी बाेलावले म्हणून आलाे हाेताे. आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे रामराजे म्हणाले.
साेलापूर - माढा लाेकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार हाेण्याची शक्यता आहे. भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे अकलूजचे माेहिते-पाटील बंडाच्या पावित्र्यात आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटाचे नेते रामराजे निंबाळर, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह माेहिते-पाटील यांची भेट घेतली. अकलूजच्या भूमीने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची कामगिरी केली आहे. यापुढेही या भूमीने अशीच कलाटणी द्यावी अशी अपेक्षा आहे, अशी भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांसमाेर मांडली.
अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर रविवारी दुपारी रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, जयंत पाटील यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासाेबत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्यातील शेकापाचे डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, माढ्याचे शिवाजीराजे कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते. धैर्यशील माेहिते-पाटील, शिवतेजसिंह माेहिते-पाटील, अर्जुनसिंह माेहिते-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. बंगल्यावर सुमारे तासभर सर्व नेत्यांची चर्चा झाली. आम्ही केवळ विजयदादांनी बाेलावले म्हणून आलाे हाेताे. आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे रामराजे म्हणाले. मात्र जयंत पाटील यांनी वेगळे संकेत दिले. अकलूजकरांनी राज्याच्या राजकारणाला कलाटण द्यावी असे पाटील म्हणाले.