अकलूजला बाल कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:16+5:302021-04-19T04:20:16+5:30
अकलूज (जि. सोलापूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत राज्यातील पहिले मोफत बाल कोविड रुग्णालय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली ...
अकलूज (जि. सोलापूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत राज्यातील पहिले मोफत बाल कोविड रुग्णालय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. लवकरच ते कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिली.
अकलूज येथे कोरोना पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस तालुक्यातील डॉक्टरांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्या बोलत होत्या. शमा पवार म्हणाल्या, आज राज्यात व देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा वृद्ध, तरुण, १५ वर्षांखालील लहान मुलांना फटका बसत असल्याचे निदर्शनास आल्याने, लहान मुलांसाठी शासकीय मोफत कोविड रुग्णालय सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिव्हिल सर्जन डॉ.प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये अद्ययावत सोईसुविधा असलेले १२ बेडचे मोफत बाल कोविड रुग्णालय सुरू करत आहोत.
कोट :::::::::::::::::::
अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत दर महिन्यात १०० ते १२५ गर्भवती महिलांची डिलिव्हरी होते. त्यातील ५० टक्के महिलांचे सिझर होते. त्यामुळे या मुख्य इमारतीमध्ये बाल कोविड रुग्णालय सुरू करता येत नसल्याने, ते उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या कौलारू इमारतीमध्ये सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी अकलूज परिसरातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मोफत सेवा देणार आहेत.
- डॉ.श्रेणीक शहा, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज