अरेरे.. सोलापुरात १० हजारांसाठी हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला
By विलास जळकोटकर | Published: November 13, 2023 10:19 PM2023-11-13T22:19:54+5:302023-11-13T22:20:37+5:30
पोलीस हवालदार प्रमोद कांबळे (नेम.एमआयडीसी पोलीस ठाणे) व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे अशी लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेयांची नावे आहेत.
विलास जळकोटकर
सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत नई जिंदगी पोलीस चौकी येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद कांबळे हे दहा हजारांच्या लाच प्रकरणी झिरो पोलिसांसह लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले. सोमवारी सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलीस हवालदार प्रमोद कांबळे (नेम.एमआयडीसी पोलीस ठाणे) व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे अशी लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेयांची नावे आहेत. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दोन गटात तक्रार झाली होती या तक्रारीचा तपास पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे होता त्यातील एका गटाला सहकार्य करण्याच्या अटीवर कांबळे याने वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड होऊन ही रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत देण्याचे ठरले होते.
आधी झिरो पोलीस मग हवालदार अकडला
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने लाख लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सापळा लावला. पोलिसांच्या जाळ्यात हवालदार कांबळेच्या वतीने १० हजारांची रक्कम घेताना झिरो पोलीस नागनाथ अलकुंटे हा रंगेहात पकडला गेला. त्यानंतर पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यास अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.