अलर्ट; मोबाईल, संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यातून पाणी येणे होतेय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 11:00 AM2021-10-21T11:00:01+5:302021-10-21T11:00:08+5:30
नवी समस्या: ‘ड्राय आय सिंड्रोम’चा धोका, रुग्णालयात वाढले रुग्ण
सोलापूर : एखादा मनुष्य दुखावला गेला की त्याच्या डोळ्यात चटकन अश्रू बाहेर पडतात तर कधी अत्यानंद झाला की, आनंदाश्रू येतात; पण जर तुमच्या डोळ्यांतून अश्रू येत नसतील तर तो एक आजार आहे. अलीकडे मोबाइल गेम व संगणकाच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘ड्राय आय सिंड्रोम’ म्हटले जाते.
वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते म्हणून वृद्धांमध्ये आणि रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये ‘ड्राय आय सिंड्रोम’ची समस्या सामान्य आहे. आता खासगी व शासकीय हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभागात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना काळातील निर्बंधामुळे आलेले ‘वर्क फ्रॉम होम’, तरुणांचे व मुलांचे ‘ऑनलाइन क्लासेस’ यामुळे या आजारात वाढ झाली आहे. तरुणांसोबतच लहान मुलांचे प्रमाण वाढले आहे.
-----
मोबाईल वापरताना ही घ्या काळजी
प्रत्येकांच्या डोळ्यांना नैसर्गिक प्रोटेक्शन असतात. मात्र कोणत्याही गोष्टींचा अतिवापर हा धोकादायकच असतो. मोबाइल आवश्यकतेनुसार ब्राइटनेस ठेवावा. डोळ्यांना थोड्या-थोड्या अंतराने चालू बंद करावे. सतत स्क्रीन पाहिल्यानंतर दूरवर बघण्याचा प्रयत्न करावा.
-----
संगणक वापरताना ही घ्या काळजी
पापण्या लवू न देता सतत संगणकाच्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहणे हे, डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे मुख्य कारण आहे. या क्रियेत पापण्या लवणेच होत नाही. संगणकाचा वापर करताना मिनिटाला १० ते १५ वेळा पापण्या मिचकावणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
----------
मोबाईल, संगणकाच्या अतिवापराने काय होऊ शकते
सतत मोबाइल स्क्रीनवर बघितल्यामुळे डोळे सुजणे, डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. डोळ्यांत जळजळणे किंवा खाज येणे, कधीकधी अंधुक दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे, संगणकाच्या स्क्रीनकडे पाहताना त्रास होणे आदी डोळे कोरडे होण्याची लक्षणे आहेत. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये कोरड्या डोळ्यांच्या पृष्ठभागावर उघड्या नसांवर सूक्ष्म कण निर्मिती होऊन डोळ्यांत एकदम खुपल्यासारख्या वेदना होऊ शकतात.
कॉम्प्युटर व मोबाईलमधून 'ब्लू रे' आणि 'शॉर्ट वेव लेंथ'ची किरणे डोळ्यावर विपरित परिणाम करतात. तसेच डोळ्याची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी झाल्याने डोळे कोरडे पडतात. हे टाळण्यासाठी 'ब्लू ब्लॉकिंग'चा विशिष्ट असा चष्मा घालावा. स्क्रीन पाहताना डोळ्याची उघडझाप करावी, स्क्रीन डोळ्याच्या खालच्या पातळीवर असावी, अक्षरांचा फाँट मोठा असावा, डोळ्यांची जळजळ होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. उमा प्रधान, नेत्ररोगतज्ज्ञ
********