नीरा खोऱ्यातील सर्व धरणे झाली ‘ओव्हरफ्लो’; १०० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:35+5:302021-09-16T04:28:35+5:30
नीरा नदी खोऱ्यात वीर, भाटघर, नीरा-देवघर आणि गुंजवणी ही चार धरणे येतात. मागील दहा दिवसांत नीरा खोऱ्यात संततधार पाऊस ...
नीरा नदी खोऱ्यात वीर, भाटघर, नीरा-देवघर आणि गुंजवणी ही चार धरणे येतात. मागील दहा दिवसांत नीरा खोऱ्यात संततधार पाऊस कोसळला अन् चारही धरणे १५ सप्टेबर रोजी शंभर टक्के भरली. परंतु पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या धरणातून सातत्याने पाणी सोडण्यात आले. भाटघर धरण १०० टक्के भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता २३.५० टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठा ६२३.२६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. १५ सप्टेंबरअखेरपर्यंत ६८४ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. नीरा नदीत ४,४२४ क्यूसेकपाण्याचा विसर्ग केला आहे.
वीर धरण १०० टक्के भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ९.४१ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठा ५७६.८५ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. १५ सप्टेंबरअखेरपर्यंत ३२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा नदीत १३,९११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. नीरा-देवधर धरण १०० टक्के भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ११.७३ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठा ६६७.१० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. १५ सप्टेंबर अखेरपर्यंत २३०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा नदीत ७५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. गुंजवणी धरण १०० टक्के भरले असून पाणी साठवण क्षमता ३.६९ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठा ७२७.१० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. १५ सप्टेंबरअखेरपर्यंत १५५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा नदीत २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. दरम्यान, नीरा खोऱ्यातील नीरा-देवघर, भाटघर, वीरपाठोपाठ गुंजवणी धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील लाखो हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.
धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत)
प्रकल्पाचे नाव : उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) : टक्केवारी
भाटघर : २३.५० : १०० टक्के
नीरा देवघर : ११.७३ : १०० टक्के
वीर : ९.४१ : १०० टक्के
गुंजवणी : ३.६९ : १०० टक्के