संपर्कप्रमुख तानाजी सावंतांच्या विराेधात शिवसेनेचे चारही जिल्हाप्रमुख आले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 06:38 PM2021-11-22T18:38:47+5:302021-11-22T18:38:52+5:30
वानकरांच्या घरी बैठक : विनायक राऊतांकडे केल्या तक्रारी
साेेलापूर: शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्याविरुद्ध शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख एकत्र आले आहेत. शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांच्याकडे चाैघांनी सावंत यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या. खासदार राऊत यांनी चाैघांना मुंबईत येण्यास सांगितल्याची चर्चा आहे.
खासदार विनायक राऊत शनिवारी साेलापूर खासगी दाैऱ्यावर हाेते. चारही जिल्हाप्रमुखांनी शनिवारी सकाळी त्यांचे स्वागत केले. दाेघांनी त्यांच्यासाेबत खासगी कार्यक्रमांना उपस्थिती लावली. सायंकाळी जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषाेत्तम बरडे, धनंजय डिकाेळे, संभाजी शिंदे यांचीही उपस्थिती हाेती. बरडे आणि वानकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहतात; मात्र बरडेंनी वानकरांच्या घरी हजेरी लावली. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेला सर्वांना साेबत घेऊन जाणाऱ्या संपर्क प्रमुखांची आवश्यकता आहे. आमदार तानाजी सावंत कशी गटबाजी करतात. यापूर्वी त्यांनी काय काय केले याची माहिती चाैघांनीही खासदार राऊत यांना दिल्याची चर्चा आहे.
---
खासदार विनायक राऊत परवा खासगी दाैऱ्यावर हाेते. माझे आणि त्यांचे जुने संबंध आहेत. या दाैऱ्यात काेणाबद्दलही चर्चा झाली नाही. आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीची तयारी करा असे राऊत यांनी चाैघांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाला की चाैघांनी मुंबईत यावे असेही सांगितले. आमचे पक्षप्रमुख रुग्णालयात आहेत. त्यामुळे या काळात कार्यकर्त्यांकडून आराेप-प्रत्याराेपाची अपेक्षा नाही.
- पुरुषाेत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
---
सावंत यांनीही दिला हाेता इशारा
तानाजी सावंत मागील आठवड्यात साेलापूर दाैऱ्यावर हाेते. या दाैऱ्यात चारही जिल्हाप्रमुख सावंत यांना भेटायला आले नव्हते. मी अजूनही जिल्हा संपर्कप्रमुख आहे. जिल्हा परिषद, महापालिकेचे उमेदवार मीच ठरविणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राेटाेकाॅल पाळला पाहिजे. प्राेटाेकाॅल न पाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा अहवाल ‘माताेश्री’ला कळवेन असा निराेप सावंत यांनी दिला हाेता. सावंत यांनी आगामी निवडणुकीची सूत्रे ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एकमेकांना पाण्यात पाहणारे चार जिल्हाप्रमुख एकत्र आल्याची चर्चा आहे.