"शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीतून झाले पाहिजे"

By संताजी शिंदे | Published: February 27, 2024 07:11 PM2024-02-27T19:11:23+5:302024-02-27T19:11:39+5:30

डॉ. शिवाजी शिंदे : मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

All government correspondence should be in Marathi | "शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीतून झाले पाहिजे"

"शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीतून झाले पाहिजे"

सोलापूर : मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे, या भाषेमध्ये संस्कृतिचा ठेवा आहे. संतांनी मराठी भाषा घडवली आहे, विविध साहित्य प्रकाराने मराठी भाषा समृद्ध झाली आहे. शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीतून झाले पाहिजे असे मत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिना निमित्त हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. शिवाजी शिंदे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, सी.ए.डॉ. सुनिल इंगळे, प्रा. कॅप्टन संदीप पाटील, प्रा. अजित देवसाळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.शिवाजी शिंदे म्हणाले की, समाज माध्यमांमुळे माणसातील संवाद कमी होत चालला आहे. माय मराठीला राजभाषा म्हणून बळकट केले पाहिजे. समाज माध्यमांमुळे भाषेमधील शब्द लोप पावत चालले आहेत. तसेच रिल्समुळे रियल जीवन विसरत आहोत, त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. 

माणसाच्या मनातील जिव्हाळा कमी  होत चालला आहे. भाषा हे विचार विनिमयाचे आणि प्रकटीकरणाचे माध्यम आहे. भाषा संवर्धन करणे, ऊर्जित करणे, टिकवणे आणि त्याचा अभिमान बाळगणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण आपले मराठी चित्रपट, नाटक पाहिले पाहिजेत तसेच मराठी पुस्तके विकत घेऊन वाचले पाहिजे. मराठी भाषेमध्ये खूप संधी आहेत, दुभाषी, सूत्रसंचालक, निवेदक आणि अनुवादक आदी क्षेत्रांमध्ये मराठी भाषेला खूप संधी आहे. तसेच मराठी भाषा ज्ञान भाषे बरोबरच व्यवहाराची ही भाषा म्हणून ओळखली पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात वैष्णवी देशपांडे आणि जयश्री पाटील मराठी अभिमान गीताने झाली. सूत्रसंचालन तृप्ती पवार यांनी केले. आभार प्रा. अजित देवसाळे यांनी मानले.

मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे : डॉ. सत्यजित शहा
० यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सत्यजित शहा म्हणाले की, कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यामध्ये खूप मोठे योगदान आहे. आपण सर्वांनी मराठी भाषा जपली पाहिजे. तिचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. भाषेवर प्रेम केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

Web Title: All government correspondence should be in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.