बारमध्ये विसरलेले सव्वापाच लाख ट्रकचालकाला केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:57 AM2021-01-13T04:57:13+5:302021-01-13T04:57:13+5:30
मंद्रूप : सोलापुरातील एका व्यापाऱ्याच्या ट्रकचालकाने मंद्रुपमधील एका बारमध्ये सव्वापाच लाख रुपये रकमेची पिशवी विसरली होती. कर्नाटकात गेल्यानंतर पिशवी ...
मंद्रूप : सोलापुरातील एका व्यापाऱ्याच्या ट्रकचालकाने मंद्रुपमधील एका बारमध्ये सव्वापाच लाख रुपये रकमेची पिशवी विसरली होती. कर्नाटकात गेल्यानंतर पिशवी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कोरे यांनी त्या व्यापाऱ्याला बोलावून घेऊन ही रक्कम परत केली. त्यांच्या प्रमाणिकपणाचे काैतुक होत आहे.
मंद्रूप येथील एका बारमध्ये बियर पिण्यासाठी एक ट्रकचालक आला होता. सोलापूर बाजार समितीवच्या एका व्यापाऱ्याचे ते वाहनचालक आहेत. त्याच्याजवळ पाच लाख २५ हजार रुपयांनी भरलेली पिशवी होती. नशा जास्त झाल्याने स्वत:जवळील पैशांबाबत भान राहिले नाही. पैशाने भरलेली पिशवी टेबलवर ठेवून विसरून ट्रक घेऊन निघून गेले.
बारचे व्यवस्थापक युन्नुस शेतसंदी व बबलू शेतसंदी यांनी पैशाची पिशवी पाहून मालक कोरे यांना याची माहिती दिली. त्यांनी ही रक्कम ज्यांची असेल त्यांना सकाळी परत करू असे सांगून सुरक्षित ठेवण्यास सांगितले.
बदलत्या युगात आजही समाजात प्रामाणिक लोक आहेत याची प्रचिती त्यांनी आणून दिली. यावेळी संतोष बरुरे, हेळवी, महेश कट्टीमनी, सतीश शिंदे, राजकुमार व्हनमाने, दगडू वाडकर उपस्थित होते.
पत्नीसह व्यापाऱ्याने घेतली धाव
संबंधितचालक विजापूरमधील एका दुकानदाराला ही रक्कम देण्यासाठी निघाला होता. होर्ती जवळ पोहोचताच सव्वापाच लाख रुपयांची पिशवी मंद्रुप मध्येच विसरल्याचे त्याच्या लक्षात आले. या प्रकाराने नशाच उतरली. त्यानंतर बारमालक सुधाकर कोरे यांची भेट घेतली. कोरे यांनी हे पैसे त्यांचेच आहेत की नाही याची खात्री केली, पण त्यास नेमकी किती रक्कम सांगता येईना. त्यानंतर सोलापुरातील संबंधित व्यापारी व त्याची पत्नी हे मंद्रूपला आले. त्यांनी पिशवीतील रक्कम बरोबर सांगितली. त्यानंतर माजी सभापती गोपाळराव कोरे यांच्या हस्ते त्या वाहनचालकाकडे रक्कम परत केली.
---
फोटा : १२ मंद्रूप
विसरलेली पैशाची बॅग ट्रकचालकाला परत करताना गोपाळराव कोरे.