बार्शीतील सर्वच राजकारणी झाले सक्रिय, राष्ट्रवादीने पदाधिकारी निवडीने कार्यकर्त्यांना केले चार्ज, तर भाजपाही अटल सुशासन सप्ताहाने चर्चेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:37 AM2018-01-10T11:37:36+5:302018-01-10T11:41:24+5:30
सध्या कोणत्याही निवडणुका नसल्या तरी सरलेल्या वर्षाच्या अंतिम टप्प्यात बार्शी शहर, तालुक्यातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सक्रियता दाखवत एकप्रकारे निवडणुकीची तयारी सुरु केली काय अशी शंका येऊ लागली आहे़
शहाजी फुरडे-पाटील
बार्शी दि १० : सध्या कोणत्याही निवडणुका नसल्या तरी सरलेल्या वर्षाच्या अंतिम टप्प्यात बार्शी शहर, तालुक्यातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सक्रियता दाखवत एकप्रकारे निवडणुकीची तयारी सुरु केली काय अशी शंका येऊ लागली आहे़ राष्ट्रवादीने आ़ दिलीप सोपल यांच्या सन्मानार्थ पदाधिकारी निवडी करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे तर भाजपामध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा सुरू आहे. बाजार समितीच्या राजकारणाच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या भाजपाच्या राजेंद्र मिरगणे यांनी अटल सुशासन सप्ताह आयोजित करून आपणही शांत नसल्याचे दाखवून दिले आहे़
बार्शी तालुका हा तसा राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून राज्याच्या राजकीय पटलावर प्रसिद्ध आहे़ तालुक्यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तीकेंद्रीत राजकारण गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू झाल्याने दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी पक्षापेक्षा नेत्यांच्या भूमिकेला जास्त महत्त्व दिले़ सध्याचा राजकीय विचार करता विद्यमान आ़ दिलीप सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत़ मध्यंतरी बाजार समिती प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण होऊन कार्यकर्त्यातही नैराश्य आल्यासारखी स्थिती दिसत होती; मात्र दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा अधिवेशन काळात येत असल्यामुळे ते बार्शीत थांबत नव्हते; मात्र यंदा त्यांनी बार्शीत थांबून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या़
औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सुधीर सोपल यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढली आणि रक्तदान शिबीर घेतले. त्यानंतर लगेच सरलेल्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाºयांच्या निवडी जाहीर केल्या़ यामध्ये तालुक्यातील सर्व विभाग, जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देऊन मरगळ आलेल्या राष्ट्रवादीत पुन्हा जाण आणली आहे़ सुरुवातीला महिला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे यांच्याकडे दिले व त्यांनीही इतर महत्त्वाची पदे तालुक्यातील महिलांना दिली़ राष्ट्रवादी युवक काँग्रेस मतदार संघ व तालुकाध्यक्षपदी सक्रिय कार्यकर्ते बाबा गायकवाड व प्रदीप पाटील यांची नियुक्ती केली़ प्रत्येक जि़प़ गटाला उपाध्यक्ष नेमण्यात आले़ शिवाय विविध आघाड्या व सेलच्या पदाधिकाºयांच्या निवडीची घोषणा करुन तब्बल ४५ कार्यकर्त्यांना पद देऊन त्यांना पक्ष कार्य करण्याची संधी दिली आहे़
भाजपामध्ये माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी विश्वास बारबोले, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी व स्थानिक नेते व पदाधिकाºयांच्या साथीने पालिकेतील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा तसेच नवीन कामांच्या भूमिपूजनाचा झपाटा सुरू केला आहे़ त्यामुळे दर आठवड्यात ते एक-दोन कार्यक्रम घेत आहेत़ त्यामध्ये सुभाष नगर तळे परिसरात उद्यान, विविध भागात शॉपिंग सेंटर बांधणे, बगिचा विकसित करणे, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन आदी कामे हाती घेत शहरासाठी तब्बल दीडशे कोटींचा निधी आगामी काळात मिळणार असल्याचे सांगत आहेत़ विविध सभांमधून ते घरकुलांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत आहेत़ त्यामुळे ते देखील सातत्याने चर्चेत राहात आहेत़
राजेंद्र मिरगणे हे मधल्या काळात काहीसे शांत होते; मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी अटल सुशासन सप्ताहाचे आयोजन करुन सर्व खात्यांच्या अधिकाºयांच्या साक्षीने विविध शिबिरे घेऊन आपण शांत नसल्याचे दाखवून दिले आहे़
शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर हे राजेंद्र मिरगणे यांच्याबरोबर अधून-मधून कार्यक्रमात दिसत आहेत तर काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड़ जीवनदत्त आरगडे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहात भाजपावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत़ तर जिल्हा उपाध्यक्ष असलेले विक्रांत पाटील हे तालुक्यात कोठेही सामाजिक प्रश्नावर आंदोलन असले की सहभागी होण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी हजर असतात़ त्यामुळे त्यांच्या उपस्थितीने काँग्रेसचे नाव चर्चेत असते़
---------------------
आता बाजार समितीलाच येणार आमने-सामने
- बाजार समितीच्या निवडणुका या नवीन कायद्यानुसार होणार असून आता शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे़ त्यादृष्टीने याद्या तयार करण्याचे काम सुरु आहे़ राज्यातील एक अग्रेसर बाजार समिती असलेल्या बार्शीच्या समितीवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे़लवकरच ही निवडणूक जाहीर होईल असे दिसत आहे़ त्यामुळे ही निवडणूक म्हणजे विधानभेच्या निवडणुकीची रंगीत तालीमच असणार आहे़ यामध्ये माजी प्रशासकीय चेअरमन राजेंद्र मिरगणे हे बाजार समितीच्या राजकारणात चांगलेच रमलेले असल्यामुळे ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की राजेंद्र राऊत व ते एकत्र येऊन लढणार याची देखील चर्चा सुरु आहे; मात्र लवकरच होऊ घातलेली ही निवडणूक तालुक्यातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे़