शॉपिंग सेंटर, मॉल्स वगळता जिल्ह्यात सर्व दुकानांना मिळाली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 02:25 PM2020-06-01T14:25:53+5:302020-06-01T14:28:28+5:30
लॉकडाऊनमध्ये सवलती : गॅरेज, प्लंबिंगसह सर्व सेवा सुरू, मॉर्निंग वॉकही करता येणार
सोलापूर : जिल्ह्यातील नागरिकांना बुधवार, ३ जूनपासून मोठा दिलासा मिळणार आहे. दुकाने, रिक्षा, खासगी कार्यालय सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियम व अटी लावून परवानगी दिली आहे.
बुधवारपासून नागरिकांना पहाटे पाच ते सायंकाळी ५ या कालावधीत फिरण्याची मुभा देण्यात आली आहे. तीन जूनपासून सायकल चालवणे, जॉगिंग, धावणे, मोकळ्या मैदानावर व्यायाम करण्यास परवानगी असेल. सामूहिक गटाने केलेल्या कार्यास परवानगी नसेल. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांनी नियमांचे पालन करावे. गॅरेज व वर्कशॉपमध्ये वाहनांच्या दुरुस्तीसाठी भेटीची वेळ ठरवून काम करावे. सर्व शासकीय कार्यालयांनी कमीत कमी १५ किंवा १५ टक्के मनुष्यबळाची उपस्थिती ठरवून काम सुरू करावे. जिल्हाधिकाºयांनी आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली नाही. जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करायला परवानगी दिली आहे.
हे बंद राहील
सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण देणाºया संस्था, सर्व चित्रपटगृहे, मॉल्स, खरेदी संकुले, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, वॉटरपार्क, मंगल कार्यालये, सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद ठेवली जातील. केश कर्तनालये, स्पा, सलून बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील.
दुकाने सम-विषम तारखेस उघडणार
- पाच जूनपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा पी १ आणि पी २ या तत्त्वावर सुरू राहतील. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने, लेन, पॅसेज विषम तारखेस उघडणे तर दुसºया बाजूची दुकाने सम तारखेस उघडणे या अटीवर खुली राहतील. दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ असतील. कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमच्या वापराला परवानगी दिली जाणार नाही. वस्तू, सामान आदींना परवानगी दिली जाणार नाही. लोकांच्या वाहतुकीसाठी रिक्षा, चार चाकी, दोन चाकी यांना परवानगी दिली आहे. रिक्षा व चारचाकीमध्ये चालका व्यतिरिक्तकेवळ दोघांना परवानगी आहे. दुचाकीवर केवळ एकाला परवानगी आहे. सर्व खासगी कार्यालये आवश्यकतेनुसार दहा टक्के मनुष्यबळासह कार्यरत राहू शकतील. उर्वरित कर्मचारी घरात बसूनच काम करतील.