बेईमान भाजपाशी यापुढे युती अशक्य, रामदास कदम यांचा हल्लाबोल, भाजपा-राष्टÑवादीत छुपी युती असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:03 PM2018-02-05T15:03:45+5:302018-02-05T15:05:06+5:30
सेनेचे बोट धरुन भाजपा महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात पोहोचला. आज हाच भाजप सेनेशी बेईमानी करीत आहे. यापुढच्या काळात अशा बेईमान भाजपाशी शिवसेना कधीच निवडणूक युती करणार नाही.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : सेनेचे बोट धरुन भाजपा महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात पोहोचला. आज हाच भाजप सेनेशी बेईमानी करीत आहे. यापुढच्या काळात अशा बेईमान भाजपाशी शिवसेना कधीच निवडणूक युती करणार नाही, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आणि सेनेचे नेते रामदास कदम यांनी सोलापुरात केले.
सेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांच्या कन्येच्या विवाहासाठी आलेल्या पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपावर थेट शरसंधान साधले. ते म्हणाले, भाजपा महाराष्टÑात फोफावला तो मुळी शिवसेनेमुळे. आज हाच भाजपा सेनेला नेस्तनाबूत करु पाहतोय ही तर आमच्याशी बेईमानी आहे. यापुढच्या काळात कधीच भाजपासोबत निवडणूक न लढवण्याचा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
५६ इंच छातीचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करायला जातात. त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून खातात. इकडे देशाच्या सीमेवर येऊन पाकिस्तानी सैनिक आमच्या भारतीय सैनिकांवर गोळ्या घालतात तरीही आमचे पंतप्रधान गप्पच. ही कसली राष्टÑभक्ती म्हणायची, अशा शब्दात कदम यांनी पंतप्रधानांचा समाचार घेतला.
आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलो आहोत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक वर्ष आधी आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार सर्वानुमते निश्चित होतील, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला सेनेचे संघटक गोविंद घोळवे, मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.
---------------------------
... म्हणून बाहेर पडणार नाही
शिवसेनेला राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला अनेकजण देतात. विशेषत: राष्टÑवादीचे नेते त्यात आघाडीवर आहेत. सेना बाहेर पडली तर राष्टÑवादी सत्तेत जाण्याच्या तयारीत आहे. म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे स्पष्टीकरण देताना रामदास कदम म्हणाले भाजपावर अंकुश ठेवण्यासाठी आणि राष्टÑवादीला रोखण्यासाठी आम्ही सत्तेत राहणार आहोत.