‘ईव्हीएम’ बाबतचे आरोप तथ्यहीन : जिल्हाधिकारी
By Appasaheb.patil | Updated: April 19, 2019 15:19 IST2019-04-19T15:17:55+5:302019-04-19T15:19:58+5:30
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी ‘ईव्हीएम ’ बाबत केली होती तक्रार

‘ईव्हीएम’ बाबतचे आरोप तथ्यहीन : जिल्हाधिकारी
सोलापूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन संदर्भात करण्यात आलेल्या आरोपात कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ बोलताना दिले.
सोलापूर मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर कोणतेही बटण दाबले तर मत कमळ चिन्हालाच जाते असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आज येथे केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते.
डॉ. भोसले म्हणाले की, काही उमेदवारांनी केलेल्या आरोपात कसलेही तथ्य नाही हे आरोप वस्तुस्थितीला धरुन नाहीत, याबाबत संबंधित मतदान केंद्राचे अधिकारी यांच्याकडे शहानिशा केली असता त्यात काहीही वस्तुस्थिती नसल्याचे स्पष्ट झाले.
पुढे बोलताना डॉ. भोसले यांनी सांगितले की, संबंधित मतदाराने अशा प्रकारे आरोप केल्यास त्याबाबत सत्यता पडताळणीसाठी चाचणी मतदानाची तरतूद आहे. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदान केंद्रावर कोणत्याही मतदाराने अशा आशयाची तक्रार केलेली नाही. ३२ ठिकाणी व्हीव्हीपॅट यंत्रात दोष निर्माण झाला होता ती बदलण्यात आली. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र सायंकाळी 6 वाजता मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या सर्वांचे मतदान करुन घेतले जाईल. असेही भोसले यांनी स्पष्ट केले.