युती करण्याचा निर्णय चुकला; अन्यथा भाजपची सत्ता आली असती: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 10:19 AM2020-01-05T10:19:24+5:302020-01-05T10:24:23+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी खूप मोठा विश्वास ठेवून भाजपने शिवसेनेसोबत युती करुन चूक केली.
सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप-शिवसेनेतील नेत्यांचे एकमेकांवरील आरोप काही थांबताना दिसत नाही. त्यातच आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला असून, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय चुकल्याचा टोला त्यांनी सेनेला लगावला आहे.
सोलापूरच्या अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेले नारायण राणे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर आमदारांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी एका कार्यकर्त्याने सध्याच्या सरकारवर खोचक प्रश्न केला आणि त्याला उत्तर देत असताना राणेंनी शिवसेनेवर टीका केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी खूप मोठा विश्वास ठेवून भाजपने शिवसेनेसोबत युती करुन चूक केली. युती केली नसती तर आज महाराष्ट्रात भाजपा सत्तेवर आली असती, अशी टीका ज्येष्ठ नारायण राणे यांनी केली. तर महाविकास आघाडीचं सरकार २ महिनेही टिकेल याची खात्री नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोणताही अभ्यास नाही, वचक नाही, कोणतंही काम नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं असेही ते सोलापूर येथील दौऱ्यावर असताना म्हणाले.