सोलापूरात पीक कर्जाच्या वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांची आघाडी, जिल्हा मध्यवर्ती बँक मागे
By admin | Published: June 30, 2017 12:52 PM2017-06-30T12:52:33+5:302017-06-30T12:52:33+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३० : एकीकडे कर्जमाफीच्या घोषणेमुळे कर्जबाकी भरण्यासाठी शेतकरी व नव्याने कर्ज देण्यासाठी बँका उदासीन असतानाच खरिपासाठी आतापर्यंत जिल्हाभरातील बँकांनी ४०४ कोटी रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच बँकांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे १५९० कोटी ४३ लाख रुपये इतके उद्दिष्ट आहे. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरणीला वेग आला आहे. मागील वर्षी जून अखेरला पावसाने सुरुवात केली होती त्यामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र सरासरीच्या तिप्पट झाले होते. यावर्षी चार जूनपासूनच जिल्ह्णात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीत पेरणीसाठी बँकांकडून जुने कर्ज भरणे व नव्याने कर्ज मागणे तसेच अनेक शेतकरी प्रथमच पीक कर्ज घेत आहेत. पाऊस चांगला असल्याने बँकांनीही शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे कर्ज वाटपाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका तसेच ग्रामीण बँकेने आतापर्यंत ४०४ कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका पुढे आहेत.
---------------------
कर्ज वाटपाचा वेग मंदावला
- जिल्हा मध्यवर्ती बँकेने १४ हजार ७५० शेतकऱ्यांना १०५ कोटी ९१ लाख रुपये वाटप केले असून, मागील वर्षी याच कालावधीत १९१ कोटी ७८ लाख रुपये वाटप केले होते.
- ग्रामीण बँकेने ७१५ शेतकऱ्यांना ९ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप केले असून मागील वर्षी याच कालावधीत १२ कोटी ९२ लाख रुपये कर्ज वाटले होते.
- राष्ट्रीयीकृत बँकांनी १८ हजार ७६९ शेतकऱ्यांना २८८ कोटी ४४ लाख रुपये इतक्या कर्जाचे वाटप केले असून मागील वर्षी याच कालावधीपर्यंत २३१ कोटी ७८ लाख रुपये वाटप केले ़
- २७ जूनपर्यंत एकूण ४०४ कोटी कर्ज वाटप झाले असून, मागील वर्षी याच कालावधीपर्यंत ४३६ कोटी ४८ लाख रुपयांचे वाटप झाले होते.
----------------------
जिल्हा बँक शून्यावरच...
कर्जदार शेतकऱ्यांना तर कर्ज दिलेच पाहिजे शिवाय नव्या सभासदांनाही कर्ज देणे बंधनकारक आहे. जिल्हा बँकेने मात्र नव्या एकाही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही. ग्रामीण बँकेने २२ तर राष्ट्रीयीकृत बँकांनी २५ शेतकऱ्यांना नव्याने कर्ज दिले आहे. मागील वर्षीपेक्षा ८६ कोटी कर्जाचे वाटप कमी करणाऱ्या जिल्हा बँकेने नव्याने एकाही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही.
------------------
आमच्याकडे पैसे नाहीत हे आम्ही सांगत आहोत. कारखानदार, शिक्षण संस्थांप्रमाणेच शेतकऱ्यांनीही घेतलेले कर्ज भरण्यासाठी पाठ फिरविल्याने इच्छा असूनही कर्ज देऊ शकत नाही.
- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक