बार्शी बाजार समितीमधील गाळे वाटप; दस्त नोंदणीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:21+5:302021-03-01T04:26:21+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुमारे २५ वर्षांपूर्वी दिलेले २०० व्यापारी गाळ्यांची मुदत ...
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुमारे २५ वर्षांपूर्वी दिलेले २०० व्यापारी गाळ्यांची मुदत फेब्रुवारी २०१४ साली संपुष्टात आलेल्या भाडे कराराच्या गाळ्या व प्लॉट नियमबाह्य वाटप झाल्याबाबत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पणनमंत्री यांच्याकडे ११ फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार केली होती. याप्रकरणी पणन संचालक सतीश सोनी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना तत्काळ चौकशी करून त्वरित अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या तक्रारीनुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी पणन संचालक यांना तत्काळ चौकशी करण्याचे व गाळावाटप, दस्त नोंदविण्यास स्थगितीचे पत्र २३ फेब्रुवारीला दिले. तसेच बाजार समितीला गाळे वाटप करण्यास व त्याच्या दस्त नोंदणीस स्थगिती दिल्याचेही लेखी कळविले आहे. तत्काळ चौकशी करून तोपर्यंत गाळावाटप, दस्त नोंदविण्यास स्थगिती देण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.
सोपल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते, पणन संचालकांचे नियम न पाळता संचालक मंडळ कामकाज करीत आहे. तसेच हे मंडळ बहुमताच्या जोरावर गैरकारभार करीत आहे. बाजार समितीची मिळकतीच्या बाबतीत मनमानी पद्धतीने व केवळ काही संचालक मंडळाच्या मर्जीतील लोकांना गैरफायदा करून देण्यासाठी संचालक मंडळ त्यांच्या पदाचा गैरवापर करीत आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची व फौजदारी गुन्ह्याची आहे. गाळावाटप करताना ऑनलाइन प्रक्रिया केली नाही. त्यामुळे सदर व्यवहारात भ्रष्टाचार झाला आहे.