भालके यांच्या सांत्वनाला फडणवीस यांच्यासमवेत मोहिते-पाटील, परिचारक, आवताडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:53+5:302020-12-25T04:18:53+5:30
पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयाच्या सांत्वनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. प्रशांत ...
पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयाच्या सांत्वनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे सरकोली येथे आले होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, माजी झेडपी सदस्य व्यंकट भालके उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवंगत आ. भारत भालके हे कोणत्याही विकासकामांसाठी सतत पाठपुरावा करत असत. त्यांच्या जाण्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. आषाढी वारी दरम्यान भालके यांच्या पंढरपुरातील घरी गेलो असल्याची आठवण फडणवीस यांनी सांगितली.
या भेटी दरम्यान विविध पक्षातील नेत्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांची कशी परिस्थिती होती. याबाबत प्रत्येकांनी आपले अनुभव सांगितले. तेव्हा फडणवीस यांनीही कोरोना झाल्यानंतर स्वतःला आलेला अनुभव सांगितला.
कल्याणराव काळे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर घडलेला एक किस्सा आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितला.
परिचारक म्हणाले, कल्याणराव काळे हे कोरोना पॉझिटिव्ह येण्यापूर्वी शिक्षक संघाची बैठक झाली होती. बैठकी दरम्यान माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे कल्याणराव काळे यांच्या बाजूला बसले होते. काळे कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी समजताच विजयकुमार देशमुख यांचा मला फोन आला आणि मला म्हणाले, कशाला बसवले काळे यांना माझ्या शेजारी. मी बाहेर फिरत नव्हतो. उगाच कार्यक्रमाला आलो. मला पण कोरोना होतो की काय असे विजयकुमार देशमुख म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.