वीर पत्नीबरोबरच वीर माता, वीर बंधूंचाही सन्मान हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:22+5:302021-08-17T04:27:22+5:30
पानगांव : बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल शहीद सुनील काळे यांना राष्ट्रपती शौर्य पदकाची ...
पानगांव : बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल शहीद सुनील काळे यांना राष्ट्रपती शौर्य पदकाची (मरणोत्तर) घोषणा झाली. त्यांच्या पत्नीकडे शौर्य पदकाचे पत्र सुपुर्द करण्यात आले. मात्र, वीरमाता, वीर बंधूंना पत्र देण्याच्या कार्यक्रमापासून लांब ठेवल्याने पानगाव ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
सीआरपीएफचे पुणे विभागाचे असिस्टंट कमांडंट शरद घड्याळे यांनी वीर पत्नी अर्चना काळे यांच्याकडे शहीद सुनील काळे यांना जाहीर झालेल्या राष्ट्रपती शौर्य पदकाचे पत्र सुपुर्द केले. स्वातंत्र्य दिनी बार्शी येथील शहीद सुनील काळे यांच्या निवासस्थानी जाऊन हे पत्र सुपुर्द करण्यात आले. यावेळी वीर पुत्र आदित्य (१४) व आयुष (११) हे उपस्थित होते. बंडझू (पुलवामा ) येथील २३ जून २०२० रोजी पहाटे ३ अतिरेक्यांना कंठस्नान घालत डोक्याला गोळी लागून सुनील काळे हे शहीद झाले होते.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहीद सुनील काळे यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले. त्यामुळे महाराष्ट्रात सोलापूरची मान उंचावली आहे. मात्र, वीर पत्नीकडे पत्र सुपुर्द केल्याचा आनंदच आहे, मात्र, वीर माता कुसुम काळे व वीर बंधू नंदकुमार आणि किरण हे मात्र पत्र सुपुर्द करण्याच्या कार्यक्रमापासून वंचित राहिले. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
...........
राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला तरी विसरु नये
आता पत्र सुपुर्द करण्यात आले आहे. २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमास तरी वीरमाता व वीर बंधू यांना सन्मानपूर्वक निमंत्रण द्यावे, अशी भावना पानगाव ग्रामस्थांनी व्यक्त केली.
......
फोटो : १६ पानगाव