ठाकुरबुवांच्या समाधी जवळ रिंगणाबरोबरच उडीच्या खेळाने वातावरण भक्तीच्या शिखरावर
By admin | Published: July 1, 2017 11:55 AM2017-07-01T11:55:00+5:302017-07-01T11:55:00+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
उघडेवाडी : शहाजी फुरडे-पाटील
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी आळंदी हुन निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा अर्धनारी नटेश्वर नगरी वेळापूर चा मुक्काम संपवून भडीशेगाव कडे मार्गस्थ होत असताना वाटेत उघडेवाडी येथील ठाकुरबुवांच्या समाधी जवळ गोल रिंगणाच्या आनंदा बरोबरच दिंद्यदिंड्यातील वारकऱ्यांनी, उडीचा खेळ खेळून आनंद घेतला. यावेळी अश्वाचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर विणेकरी, तुळसधारी महिला, व पखवाज वादक यांनीही धावून रिंगण पूर्ण केले. उडीच्या खेळात टाळ मृदंगाच्या गजराने वातावरण भक्तीच्या परमोच्च शिखरावर पोहचले होते.
माऊली सकाळी साडे सहा वाजता मार्गस्थ झाली बरोबर साडे आठ वाजता सोहळा उघडेवाडी येथे पोहचला. आखून ठेवलेल्या रिंगणात एकामागून एक दिंड्या येत होत्या.पालखी आत आल्यावर एक प्रदक्षिणा पूर्ण केली. व मंडपात विसावली. प्रत्येक दिंड्यातील झेंडेकरी पालखीच्या कडेला उभे राहिले होते.त्यानंतर राजाभाऊ चोपदार, रामभाऊ व बाळासाहेब चोपदार यांनी रिंगणाची पाहणी केली. तोपर्यंत दोन्ही अश्व मैदानात येऊन थांबले होते. दोन्ही अश्वानी जोरात धावत एक रिंगण पूर्ण केले.आणि मैदानात दिंड्या-दिंड्यात विठू नामाचा व माऊली तुकोबांचा जयघोष व विविध प्रकारचे खेळ सुरू झाले, कांही दिंड्यातील महिलांनी फेर धरून गवळणी गाण्यास सुरुवात केली.
पुन्हा मैदानात माउलींच्या पालखीच्या कडेने सर्व विणेकरी,पखवाज वादक, तुळस धारी महिला यांनी एक रिंगण पूर्ण केले, तर टाळकरी जमिनीवर झोपून भजनात तल्लीन होऊन टाळ वाजवत होते, त्यांना राजाभाऊ चोपदार हातवारे करून प्रोत्साहन देत होते. त्यामुळे सर्व मैदानात माउलीमय वातावरण तयार झाले होते. त्याठिकाणी वारक?्यांनी न्हयाहरी ही केली. रिंगण व उडीच्या खेळाचा आनंदाने प्रफुल्लित होऊन वारकरी संत सोपान काका व माऊलींच्या भेटी चा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्याचा ओढीने हिरव्यागार उसाच्या शेतातील रस्त्यामधून तोंडले-बोंडले येथे दुपारच्या विश्रांती साठी थांबला. रात्री पालखी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे मुक्काम करणार आहे.