विठ्ठल पूजेच्या मुलाखतीला पंढरपूरच्या पुजार्यांची दांडी
By Admin | Published: May 19, 2014 01:30 AM2014-05-19T01:30:15+5:302014-05-19T01:30:15+5:30
राज्यातील १६१ उमेदवार उपस्थित
पंढरपूर : विठ्ठल मंदिर व परिसरातील देवतांचे रोजचे नित्योपचार करणे व पूजेसाठी रविवारी राज्यातील १६१ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. पंढरपूरमधील ३३ उमेदवारांनी मुलाखतीला दांडी मारली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील नित्योपचार कायमस्वरुपी विधिवत व्हावेत यासाठी हिंदू धर्मातील पुजार्यांची भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिर समितीच्या २५ एप्रिलच्या बैठकीत झाला होता. मंदिरातील पुजार्यांच्या १२ पदांसाठी १९९ अर्ज आले होते. त्यात महिला पुजार्यांचे २३ अर्ज होते. समितीने रविवारी पुजारी पदासाठी आलेल्या १४५ पुरुष व १६ महिला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, अशी माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली. मुलाखतीत सर्व देवदेवतांचे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व दैनंदिन नित्योपचार व वर्षात येणारे सर्व नैमित्तिक उपचार व विधी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता येतात का, त्याचबरोबर श्रींची षोडशोपचारे पूजा करण्यासाठी, पोषाख व मंत्र, भजन, आरती तसेच काकड आरतीपासून शेजारतीच्या विधीपर्यंतची माहिती विचारण्यात आली. परीक्षेचा निकाल समितीच्या पुढील बैठकीत जाहीर करण्यात येईल.