आंबेडकरांच्या वारसांनी सर्वसमावेशक धोरणाला काळीमा फासला : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:37 AM2019-04-15T10:37:35+5:302019-04-15T10:39:47+5:30
मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांनी मुस्लीम कट्टरतावाद्यांसोबत जाण्याची भूमिका घेतली. देशातील सर्वसमावेशक धोरणाला काळीमा फासला, अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
बाळीवेस येथील बसव केंद्रात मेळाव्याचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. लिंगायत धर्मगुरू बसवलिंग महास्वामी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, लिंगायत समन्वय समितीचे प्रमुख विजयकुमार हत्तुरे, रेवणसिध्द आवजे, बसव केंद्राचे प्रमुख शिवशंकर काडादी, मोहोळचे नागेश बिराजदार, अमर सगरे, मंगळवेढ्याचे मल्लू बिराजदार, संगमेश्वर चौगुले, उत्तर सोलापूरचे दत्ता इरपे, अमित रोडगे, प्रा. राजू प्याटी, केदार म्हमाणे, नागनाथ मेंगाणे, दयानंद शिवयोगी, बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, बसवेश्वर महाराजांनी सर्वसमावेशक धर्माची स्थापना केली. पण आता इथे जाती आणि धर्माच्या नावावर मते मागितली जात आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी तर ‘एमआयएम’सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. ‘एमआयएम’ कोणत्या पध्दतीने काम करते हे तुम्हाला माहीत असेलच. दुसरीकडे माकपच्या लोकांनी वंचित आघाडीसोबत युती केली आहे. माकपचे लोक तर देव-धर्म मानत नाहीत. देवाला दगड मानतात. हे लोक केवळ काँग्रेसच्या मतविभाजनासाठी उभे आहेत. मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
बसवलिंग महास्वामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना नोकरी करण्याऐवजी पकोडे तळायला सांगतात. गंगा नदीला शुध्द करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले. प्रत्यक्षात गंगा नदी स्वच्छ झाली नाही. मोदींचा आत्मा शुध्द नाही. तो असता तर गंगा शुध्द झाली असती. ‘जीएसटी’मुळे व्यापारी हैराण झाले आहेत. नोटाबंदीनंतर नव्या नोटा छापायला २८ हजार कोटी रुपये खर्च झाले. एवढा पैसा शेतकºयांसाठी खर्च करता आला असता. पण एका अजाणत्या माणसाने हा निर्णय घेऊन देशाचे नुकसान केले, अशी टीकाही महास्वामी यांनी केली.