वापराविना रुग्णवाहिकाच पाच महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:46 AM2020-12-05T04:46:41+5:302020-12-05T04:46:41+5:30
रुग्णवाहिका नसल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील महिला रुग्णांसह इतर रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडून संबंधित ...
रुग्णवाहिका नसल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील महिला रुग्णांसह इतर रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडून संबंधित रुग्णवाहिकेची तत्काळ दुरुस्ती करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
सांगोला ग्रामीण रुग्णालयात सन २००४ साली एमएच १४/ एएच ३५७८ रुग्णवाहिका (१०२) रुग्णांच्या सेवेत दाखल झाली. शहर व तालुक्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामीण रुग्णालयाकडे एकच रुग्णवाहिका आहे. सततच्या वापरामुळे रुग्णवाहिकेची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शहरी व ग्रामीण भागातून नातेवाईकांचा कॉल आला की, याच रुग्णवाहिकेचा वापर होत होता. अहोरात्र सेवेमुळे या रुग्णवाहिकेचा संपूर्ण पत्रा गंजलेल्या अवस्थेत असून, वायरिंग खराब तर इंजिन नादुरुस्त झाल्याने रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर आहे .नादुरुस्त रुग्णवाहिका इतर वाहनांच्या मदतीने दुरुस्तीसाठी सोलापूर येथील कार्यशाळेकडे पाठवली आहे. परंतु शासनाकडे सदर रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीसाठी पैसे नसल्याचे सांगण्यात येत आहे.
----
खासगी रुग्णवाहिकाधारकांकडून रुग्णांची पिळवणूक
सांगोला ग्रामीण व शहरी भागातून महिलांना प्रसूतीसाठी तसेच कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया, इतर आजारांसह अपघातानंतर जखमींना उपचारासाठी कॉल आल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होतात. अशावेळी खासगी रुग्णवाहिका अव्वाच्या सव्वा पैसे आकारून नातेवाईकांची पिळवणूक करीत असतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
चौकट ::::
सेवा अभियंत्यांकडे सहा वेळा पत्रव्यवहार
सध्या ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्णवाहिका नसल्यामुळे सोलापूर येथून औषधे, लसी, साहित्य घेऊन येण्यासाठी तसेच कोविड-१९ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेऊन जाणे अडचणीचे ठरत आहे. रुग्णवाहिका दुरुस्त करून मिळावी म्हणून ग्रामीण रुग्णालय प्रशासनातर्फे रुग्णवाहिका चालक पी. व्ही. नवले यांनी सेवा अभियंता यांच्याकडे ५ ते ६ वेळा लेखी पत्र देऊन विनंती केली आहे.