अमेरिकेचा सकर मासा उजनी धरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:54+5:302021-04-01T04:22:54+5:30
अन्य प्रजातीचा ठरु लागलाय कर्दनकाळ लोकमत न्यूज नेटवर्क करमाळा : मांगूर जातीच्या माशामुळे उजनी जलाशयातील मासेमारी धोक्यात आली आहे. ...
अन्य प्रजातीचा ठरु लागलाय कर्दनकाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
करमाळा : मांगूर जातीच्या माशामुळे उजनी जलाशयातील मासेमारी धोक्यात आली आहे. त्यातच आता आणखी एका ‘सकर’ ऊर्फ हेलिकॉप्टर नावाच्या काटेरी माशाची यात भर पडली आहे. हा मासा मोठ्या प्रमाणात उजनी जलाशयात आढळत आहे. यामुळे अन्य माशांच्या प्रजातीवर संकट ओढवले आहे. अमेरिका हे या माशाचे उगमस्थान असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
उजनी धरणात सध्या चिलापी, रऊ, वाम, कटला यासह विविध प्रजातीचे मासे आहेत. सकर माशांमुळे या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. शिवाय मच्छिमारांच्या जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागल्याने मच्छीमार हैराण झाले आहेत.
सकर माशाचे उगमस्थान अमेरिकेतील आहे. कालांतराने मुंबई खाडीत व वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळला होता. तेव्हापासूनच मत्स्य अभ्यासकांनी धोक्याची सूचना दिली होती.
मात्र, या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र व्यापून टाकले आहे. मुळात या माशाची ओळख फिश टँकमधील शोभिवंत मासा म्हणून होती. मात्र, फिश टँकमध्ये अनेक शोभिवंत माशांनी प्रवेश केल्यानंतर व पाळणाऱ्यांची हौस फिटल्यानंतर हा मासा खाडीत व नदीत सोडून देण्यास सुरुवात झाली.
या माशाची वाढ जलदगतीने तर होतेच शिवाय हा मासा मिश्राहारी असल्याने तो शेवाळाबरोबर इतर माशांना व त्यांची अंडी खाण्यात तरबेज असतो. सकर (हेलिकॉप्टर) मासा हा टणक असल्याने इतर माश्यांपासून सुरक्षित राहतो. साहजिकच त्यांच्या संख्येत जलदगतीने वाढ होते. शिवाय पाण्याबाहेर आला की, तो जमिनीवर सापाप्रमाणे नागमोडी चालतो तसेच पाण्याबाहेर चार ते पाच तास जिवंतही राहू शकतो. त्याच्या संपूर्ण अंगाला काटे असल्याने या माशाला ग्राहक मात्र मिळत नाहीत.
असा हा सकर (हेलिकॉप्टर) मासा उजनीत मोठ्या संख्येने आढळू लागला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही. त्यासाठी जाळी फाडावी लागत आहेत. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे केत्तूरचे मच्छीमार व्यावसायिक सोमनाथ कनिचे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी उजनी जलाशयाच्या कोंढार चिंचोली येथे मच्छिमारांना जलाशयाच्या पाण्यामध्ये सोनेरी कासव सापडले होते. त्यानंतर केत्तूर परिसरातील जलाशयाच्या फुगवट्याच्या पाण्यात एका शेतकऱ्याला पाणमांजर दिसले होते. तर उजनी जलाशयात यापूर्वी कधीही न दिसलेला जिताडा जातीचा मासाही प्रथमच सापडला होता व आता सकर मासा सापडला आहे.
--
कसा आहे सकर मासा
सकर माशामध्ये दोन फुफ्फुसे असतात म्हणून त्याला ‘लंग फिश’ म्हणतात. या माशाचे पर हे पंख्यासारखे असतात. कधी -कधी हे मासे पाण्यातून बाहेर येऊन फूट-दीड फूट हवेत उडून हवा फुफ्फुसामध्ये भरून घेतात. पाण्यातून बाहेर येत असल्यामुळे त्याला फ्लाईंग फिश तर कधी-कधी हेलिकॉप्टर मासा म्हणूनही ओळखतात. श्वसनासाठी कल्ले असतात. हा मासा कॅट फिश या ग्रुपमध्ये मोडतो. संपूर्ण अंगावर काटेरी खवले असतात व परांना लांब काटे असतात.
----
जाळ्यात सापडल्यावर या माशांना वेगळे करणे कठीण असते. बोरीच्या काट्यांसारखे याचे काटे असतात. ‘एक्झोसीट्स’ या वैज्ञानिक नावानेही हा मासा ओळखला जातो. पाण्यातील शेवाळ हे या माशाचे प्रमुख खाद्य आहे. कॅट फिश गणातील माशांमध्ये फुफ्फुसे असल्याकारणाने हे मासे पाण्याबाहेर काही काळ श्वसनाद्वारे जिवंत राहू शकतात.
- डॉ. अरविंद कुंभार, प्राणीशास्त्र अभ्यासक
----