झोपलेल्या वृद्धावर काेयत्याने हल्ला पोंधवडीतील घटना; हाताचे बोट तुटले, करमाळ्यात उपचार सुरू
By काशिनाथ वाघमारे | Published: January 16, 2024 04:51 PM2024-01-16T16:51:49+5:302024-01-16T16:53:19+5:30
मध्यरात्री जेवन आटोपून बाजेवर झोपलेल्या वृद्धावर अनोळखी व्यक्तींनी धार-धार काेयत्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले.
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : मध्यरात्री जेवन आटोपून बाजेवर झोपलेल्या वृद्धावर अनोळखी व्यक्तींनी धार-धार काेयत्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचे हाताचे एक बोटही तुटले. या घटनेनंतर हल्लेखोर रात्री अंधारात फरार झाले.
सुखदेव बाबा क्षीरसागर (वय ७६, रा. पोंधवडी, ता. करमाळा) असे जखमी वृद्धाचे नाव असून सोमवार, १५ जानेवारी रोजी मध्यरात्री पोंधवडी येथे ही घटना घडली.
सोमवार रात्री जेवण उरकून सुखदेव क्षीरसागर हे त्यांच्या वस्तीसमोर लाकडी बाजेवर झोपले होते. दारात विजेचा बल्ब चालू होता. मध्यरात्रीनंतर अनोळखी व्यक्ती आले आणि प्रथम वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने ऊसतोड कोयत्याने डोक्यावर व तोंडावर वार केल्याने सुखदेव हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचे एक बोट तुटले आहे. डोक्याला जबर मार लागला आहे. त्यानंतर हल्लेखोर अंधारात पळून गेले. जखमी क्षीरसागर जोरजोरात ओरडू लागले. त्यांच्या आवाजाने नातेवाईक जागे झाले. त्यांनी तात्काळ उपचारासाठी त्यांना करमाळा येथे आणले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसात अनोळखी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे.