'होळी करा लहान पोळी करा दान'; अंनिस सोलापूर शहर शाखेचा उपक्रम
By शीतलकुमार कांबळे | Updated: March 22, 2024 20:03 IST2024-03-22T20:02:51+5:302024-03-22T20:03:55+5:30
तीन ठिकाणी पोळी संकलन केंद्र

'होळी करा लहान पोळी करा दान'; अंनिस सोलापूर शहर शाखेचा उपक्रम
सोलापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेतर्फे खास होळी सणानिमित्त होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन खास पुणे येथील महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी फडकुले सभागृहात केले.
भारतात हजारो लाखो लोक गरिबीमुळे उपाशीपोटी जगत असताना या होळीत आपण पुरणपोळी नेवेद्य म्हणून जाळून खाक करण्यापेक्षा गरिबांना दान करणे जास्त हितकारक आहे, असे मिलिंद देशमुख यांनी सांगितले. सोलापूर शहरात एकूण तीन ठिकाणी पोळी संकलन केंद्रे आयोजित करण्यात आलेली आहेत. या केंद्रात लोकांनी पुरणपोळी दान करावी. होळी करा लहान पोळी करा दान या उपक्रमा अंतर्गत आपण पर्यावरण पूरक वर्तन करून समाज हितकारक कार्य करूयात असे मत शहर शाखा कार्याध्यक्ष डॉ अस्मिता बालगावकर यांनी व्यक्त केले.
उद्घाटनासाठी सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष शंकर खळसोडे, प्रधान सचिव ब्रह्मानंद धडके, केदारीनाथ सुरवसे, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, जिल्हा शाखा अध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, आर. डी. गायकवाड, जिल्हा शाखा कार्याध्यक्ष उषा शहा, मधुरा सलवारू, संजीवनी देशपांडे, सुनीता गायकवाड, प्रकाश कनकी, विजय जाधव, मिलिंद गायकवाड, डॉ निलेश गुरव, धनाजी राऊत, अरुण गायकवाड इ कार्यकर्ते उपस्थित होते.