सोलापूर विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापक भरती संदर्भात नेमली चौकशी समिती
By संताजी शिंदे | Published: June 3, 2024 12:13 PM2024-06-03T12:13:04+5:302024-06-03T12:13:52+5:30
कुलसचिव योगिनी घारे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
संताजी शिंदे, सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठातील सहायक प्राध्यापक (कंत्राटी) पदाच्या भरतीमध्ये अनिश्चितता असून, याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून कुलसचिव योगिनी घारे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
सोलापूर विद्यापीठ सोलापूर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता विद्यापीठांमध्ये जी सहायक प्राध्यापक (कंत्राटी) पदासाठी भरती करण्यात आली आहे, मात्र त्यामध्ये अनिश्चितता दिसून येत असल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी केली होती. याबाबत डोंगरे यांनी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांना मार्च २०२४ मध्ये निवेदन दिले होते. कुलगुरूंनी याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.
तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०३ अन्वये कंत्राटी सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीसंदर्भात पाच सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, मुंबई विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ. वैशाली बंबोले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगावचे प्राचार्य डॉ. एस.डी. नवले, डी.बी.एफ. दयानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.पी. उबाळे, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शीचे प्रा. डॉ. व्ही.पी. शिखरे यांची नियुक्ती झाली आहे.
आलेल्या तक्रारीवरून कुलगुरूंच्या आदेशावरून चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये पदाने खूप मोठी माणसे आहेत. समितीची बैठक होऊन, त्यात भरतीसंदर्भात अहवाल तयार होईल. त्यानंतर अहवालावरून पुढील योग्य ती कार्यवाही होईल. - योगिनी घारे, कुलसचिव