सांगोला स्थानकावर एसटीत चढताना वृद्धेची बोरमाळ लंपास
By काशिनाथ वाघमारे | Published: May 14, 2024 08:14 PM2024-05-14T20:14:43+5:302024-05-14T20:14:58+5:30
पाठीमागून वृद्ध चंद्राबाई चढत असताना गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ लंपास केली.
सोलापूर : एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची एक तोळे सोन्याची बोरमाळ लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास सांगोला बस स्थानकावर घडली. याबाबत, राधाबाई रखमाजी बजबळकर (रा. जुनोनी, ता. सांगोला) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत, फिर्यादी राधाबाई बजबळकर आणि त्यांच्या सासू चंद्राबाई बजबळकर व नणंद कल्पना हिप्परकर अशा तिघीजणी मिळून मंगळवारी सकाळी १० वाजता सांगोला तालुक्यात जुनोनी येथून निघाल्या. महूदला जाण्यासाठी सांगोला बसस्थानकावर आल्या होत्या. त्या दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास सांगोला-अकलूज एसटी बस लागल्याने महूदला जाण्यासाठी सून राधाबाई व नणंद कल्पना हिप्परकर एसटीत अगोदर चढल्या.
पाठीमागून वृद्ध चंद्राबाई चढत असताना गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ लंपास केली. हा प्रकार चंद्राबाई यांच्या लक्षात येताच त्यांनी सुनेला सांगितले. इतक्यात वृद्धेने आरडाओरड केल्यामुळे चालकाने एसटी बस थेट सांगोला पोलिस स्टेशनला आणून पोलिसांना घडला प्रकार सांगितला. यावेळी महिला पोलिस कर्मचारी यांनी महिला प्रवाशांची व पोलिसांनी पुरुषांची झाडाझडती घेतली. मात्र, बोरमाळ मिळून आली नाही.