कुसळंबजवळ अनोळखी वाहन गेले धडकून; जखमी पाडसाला हलवले उपचाराला
By काशिनाथ वाघमारे | Published: April 8, 2023 05:08 PM2023-04-08T17:08:18+5:302023-04-08T17:11:15+5:30
कातडी फाटल्यामुळे सहा टाके घालण्यात आले. उपचार करून परत वन विभाग अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
सोलापूर : बार्शी-कुसळंब राज्य मार्गावर एका कंपनी समोर अनोळखी वाहनाने जोरदार धडक देऊन पाडसाला गंभीर जखमी करून निघून गेले. एका हॉटेल चालकांने व गावकऱ्यांनी त्या पाडसाला तत्काळ उचलून रस्त्याच्या कडेला आणून पाणी पाजून संबंधित वन विभाग अधिकाऱ्याला बोलावून उपचारासाठी बार्शी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्यात आले.
याबाबत वनविभाग अधिका-यांकडून मिळालेली माहिती अशी की, ६ एप्रिल २०२३ रोजी सात वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुसळंब राज्य मार्गावर एका अनोळखी वाहनाने हरणीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिच्या डाव्या पायाच्या वरची बाजू फाटली. या अपघातात डोक्यालाही जखम झाली. त्यामुळे हरणीचे पिल्लू तिथे तडफडत असताना जामगावातील नागरिकांनी व हॉटेल चालकांनी तिला रस्त्याच्या बाजूला घेतले. पाणी पाजून वनविभाग अधिकाऱ्याला फोनवरुन याची माहिती दिली. वनविभाग अधिकारी करे, वन परिमंडळ अधिकारी खोंदे व चालक बादशहा मुल्ला हे घटनास्थळी दाखल झाले. गावातील नागरिक बाळासाहेब जगताप, आबा गडदे, सचिन गडदे, समाधान झगझाप, बालाजी कागदे, जितू झांबरे, योगेश शिंदे यांनी मदत करून तत्काळ बार्शी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले.
कातडी फाटल्यामुळे सहा टाके घालण्यात आले. उपचार करून परत वन विभाग अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. पाडस घाबरल्यामुळे त्यांनी कार्यालयाकडे नेले. त्याला वन विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यास व्यवस्थित चालता आले की वनविभागात सोडून देण्यात येणार असल्याचे वन परिमंडळ अधिकारी खोंदे यांनी सांगितले.