आनंद चंदनशिवेंसह पदाधिकाºयांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:49 AM2019-04-23T10:49:45+5:302019-04-23T10:52:15+5:30
महापुरुष मूर्ती अवमानप्रकरण; शिवप्रेमींनी केली पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शने
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कोलंबिया युनिव्हर्सिटीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रचलित सिंहासनावर बसविण्यात आलेल्या पुतळ्यावरून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी नगरसेवक आनंद चंदनशिवे, उत्सव समिती अध्यक्ष अक्षय प्रकाश माने यांच्यासह पदाधिकाºयांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी. बी. ग्रुप) च्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रतिकृतीचा देखावा तयार करण्यात आला होता. युनिव्हर्सिटीसमोर सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगावर असलेल्या प्रचलित पोशाखाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला होता. ही बाब लोकांच्या नजरेत आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ही बाब संबंधित मंडळाचे आधारस्तंभ नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या लक्षात आणून दिली.
या प्रकारामुळे दोन्ही समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, अशा प्रकारची मूर्ती बसवून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लावण्यात आलेल्या मूर्तीमुळे दोन्ही समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, अशी फिर्याद ललित मिलिंद धावणे (वय २३, रा. गोल्ड फिंच पेठ, शिंदे चौक, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात दिली आहे. भादंवि कलम १५३ (अ) प्रमाणे दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत.
मूर्तीमुळे भावना दुखावल्यास दिलगिरी : चंदनशिवे
च्कोणताही सामाजिक उपक्रम असो किंवा मिरवणूक प्रथमत: छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून त्याची सुरुवात करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिवरणुकीत कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या देखाव्यासमोर बसविण्यात आलेली मूर्ती ही पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकार सुभाष आल्हाट यांच्याकडून भाड्याने मागविण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलीस अधिकाºयांनी ही बाब आमच्या लक्षात आणून दिली. तत्काळ आम्ही मूर्ती हटवून मिरवणूक पूर्ण केली. शिवसैनिक व भीमसैनिकांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. भावना दुखावल्या असल्यास मी मंडळाचा मार्गदर्शक या नात्याने जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे मत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केले आहे.
लोकभावनेची दखल घेत आनंद चंदनशिवे व त्यांच्या पदाधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कायदा व शांतता बिघडू नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. सोशल मीडियावरून समाजाच्या भावना दुखावतील, अशा पोस्ट करू नयेत, शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल.
- महादेव तांबडे,
पोलीस आयुक्त.