आनंद तानवडे कार्यालयात; अण्णाराव बाराचारे यांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:16 AM2020-02-25T10:16:36+5:302020-02-25T10:19:03+5:30
सोलापूर जिल्हा परिषद पक्षनेतेपदाचा खेळ; अध्यक्षांनी नियुक्ती केली कायम
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पक्षनेतेपदावर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटावर मात करीत माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे आनंद तानवडे यांची सोमवारी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी नियुक्ती कायम केली. त्यामुळे तानवडे कार्यालयात जाऊन बसले तर आता अण्णाराव बाराचारे यांची भटकंती सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेतील पक्षनेतेपदाचा वाद १२ दिवसांपासून सुरू आहे. १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत विषय समिती सदस्यांबरोबर विरोधी पक्षनेते व पक्षनेत्याची निवड होणार म्हणून पक्षनेतेपदी अण्णाराव बाराचारे यांची शिफारस भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केली. पण या सभेत फक्त विषय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे दुसºया दिवशी बाराचारे यांनी जिल्हाध्यक्ष पवार यांनी दिलेले पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना दिले.
वायचळ यांनी हे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांना दिल्यावर त्यांनी पक्षनेते कार्यालयाचा ताबा घेण्याबाबत बाराचारे यांना परवानगी दिली. त्यानुसार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी बाराचारे पक्षनेते कार्यालयाचा ताबा घेतला. याच दिवशी सायंकाळी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषदेत येऊन बाराचारे यांचा सत्कार केला.
बाराचारे यांनी पक्षनेते कार्यालयाचा ताबा घेतल्याचे समजताच आनंद तानवडे अस्वस्थ झाले. कार्यालयासाठी त्यांची भटकंती सुरू झाली. त्यानंतर अध्यक्ष कांबळे यांनी पक्षनेतेपदाची निवड झालीच नसल्याचे स्पष्ट केले. पण गेल्या आठवड्यात दोन दिवस बाराचारे यांना कार्यालयात बसण्याची संधी मिळाली. सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत पक्षनेते कार्यालयाला कुलूप होते. अध्यक्ष कांबळे यांनी पक्षनेतेपदी आनंद तानवडे यांची नियुक्ती केल्याचे पत्र प्रशासनाला दिले. त्यानंतर तानवडे यांनी कार्यालयात येऊन पदभार घेतला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. कार्यालय आणि खुर्ची एकच, मात्र आठवड्यात दोघांनी या खुर्चीवर बसून सत्कार स्वीकारले. त्यामुळे पक्षनेतेपद निवडीचा विषय जिल्हा परिषदेत चर्चेचा बनला आहे.
विरोक्षी पक्षनेते व पक्षनेते निवडीचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व अधिकार आमदार विजयकुमार देशमुख यांना दिले होते. आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सुभाष देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषदेत समविचारी गटाची सत्ता आली. त्यामुळे या सर्व प्रमुखांशी चर्चा करून अध्यक्ष कांबळे यांनी आपली नियुक्ती केल्याचे तानवडे यांनी स्पष्ट केले.
बाराचारे समर्थक नाराज
- पक्षनेते कार्यालयाचा ताबा तानवडे यांनी घेतल्याचे समजताच अण्णाराव बाराचारे जिल्हा परिषदेत आले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ बैठकीनिमित्त मुंबईला गेल्याचे कळताच त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्या कार्यालयात धाव घेतली. भाजप पक्षप्रमुखांनी नियुक्तीबाबत शिफारस केलेली असताना अध्यक्ष कांबळे हे पुन्हा दुसºयांची नियुक्ती कायम कशी काय करू शकतात असा सवाल केला.