आनंद तानवडेंचाही जातीचा दाखला बोगस; सचिन कल्याणशेट्टी शाळेत न जाता उकळतात पगार : शंकर म्हेत्रे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:42 PM2019-04-05T12:42:17+5:302019-04-05T12:55:24+5:30
अक्कलकोट काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची पत्रकार परिषद़ सोलापूर लोकसभेचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यावरही केला आरोप
दुधनी : जयसिद्धेश्वर स्वामींनी मागासवर्गीय समाजाचा हक्क हिसकावून बोगस जातीच्या दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवित आहेत. विरोधक या गोष्टीचा धसका घेऊन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी खोटी बातमी पसरवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. आनंद तानवडे यांचाही दाखला बोगस असून, सचिन कल्याणशेट्टी यांनी पाणलोटमध्ये भ्रष्टाचार केला आहे. शाळेत न जाता लाखो रूपये पगार उकळतात, असा आरोप काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आजपर्यंत मागासवर्गीय समाजाला आपल्या मठात प्रवेश नाकारला. ते महाराज बोगस जातीचा दाखला मिळवून निवडणूक लढवित आहेत. त्याबद्दल लिंगायत समाजात तीव्र नाराजी आहे. विशेषत: लिंगायत स्वतंत्र धर्माला विरोध करणारे एकमेव महाराज जयसिद्धेश्वर असून, त्यांचा पर्दाफाश लवकरच करणार आहे.
आनंद तानवडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय कोळी हे जयसिद्धेश्वर स्वामींचे हस्तक आहेत, असा आरोपीही शंकर म्हेत्रे यांनी केला.
शंकर म्हेत्रे म्हणाले, लोकमंगल दूध भुकटी प्रकरणातले आरोपी व शाळेत एकदाही न जाता दरवर्षी लाखो रुपये पगार उचलणारे सचिन कल्याणशेट्टी शाळेत शिक्षक आहेत. कल्याणशेट्टी यांनी किती पिढ्या बरबाद केल्या, याचे आत्मचिंतन करावे, असा प्रश्न म्हेत्रे यांनी उपस्थित केला. यावेळी माजी सभापती राजकुमार लकाबशेट्टी, मंगला पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
सचिन कल्याणशेट्टी यांनी पाणलोट क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे. त्याबाबत सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याचे कापसे यांनी सांगून काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्याबाबत कल्याणशेट्टी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अवमानकारक भाषा वापरल्याने त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचेही शहराध्यक्ष भीमा कापसे यांनी सांगितले.
मी एक भाजप कार्यकर्ता आहे. शंकर म्हेत्रे यांनी जे बोलले आहे, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, ते पहावे. त्यांच्याबरोबर माझी दुश्मनी नाही. भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी विरोधात बोलल्याबद्दल निषेध व्यक्त करतो.
-आनंद तानवडे, पक्षनेता, जिल्हा परिषद, सोलापूर
त्यांच्यात खरंच हिम्मत असेल तर माझ्यासह पालकमंत्र्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून दाखवावाच. नाही त्यांचे धिंडवडे नाही काढले तर माझं नाव मी नक्कीच सांगणार नाही.
-सचिन कल्याणशेट्टी,
तालुकाध्यक्ष, भाजप, अककलकोट