...अन् जिल्हाधिकारी म्हणाले, ‘या तुमच्यासोबत एक फोटो काढू...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:53+5:302021-06-22T04:15:53+5:30
वडवळ : मोहोळ तालुक्यातील पिरटाकळी येथे आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात मग्न ...
वडवळ : मोहोळ तालुक्यातील पिरटाकळी येथे आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात मग्न असताना अचानक जिल्हाधिकारी तिथे येतात अन् आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधतात. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक तर करतातच पण उपस्थित ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांना म्हणतात ...या तुमच्यासोबत एक फोटो काढूया.
पिरटाकळी येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर एका शासकीय कामानिमित्त भेट दिल्यानंतर तेथून जाताना फंड वस्ती येथे त्यांना काही आरोग्य कर्मचारी दिसले. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याची खबरच नव्हती. ते आपल्या कामात व्यस्त होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली.
यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, सरपंच अनिकेत पाटील, उपसरपंच हणमंत खळसोडे, ग्रामसेविका उज्ज्वला उमाटे, पोलीस पाटील शंकर पाटील, संतोष सावंत, सत्यवान जावळे, बाळासाहेब पाटील, भीमराव थिटे, प्रवीण थिटे, उद्धव फंड उपस्थित होते.
----
शाबासकीची थाप दिली...
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्याचे काम आरोग्यसेवक सूर्यकांत आगावणे, दीपक गायकवाड, योगेश इराबत्ती करत होते तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या टेस्ट करत आहात, किती टेस्ट झाल्या, टेस्टचे रिझल्ट काय आहेत, अशा प्रकारची विचारणा केली. जास्तीत जास्त टेस्टिंग करून योग्य तो पाठपुरावा करण्यास सांगितले. चालू असलेले काम अतिशय योग्य पद्धतीने चालले आहे, तुमचे अभिनंदन, अशा शब्दांत त्यांनी शाब्बासकीची थाप दिली. शाबासकीची थाप दिली..
--- फोटो : २१ पीरटाकळी पीरटाकळी येथे आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांसोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तहसीलदार जीवन बनसोडे, आरोग्य कर्मचारी.