अन् त्या टॅक्सीचालकाच्या गावी पोहोचली आरोग्य खात्याची टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:52 AM2020-03-12T11:52:39+5:302020-03-12T11:55:46+5:30
गुरसाळेच्या त्या टॅक्सीचालकाच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ; सोशल मिडियावरील अफवांमुळे ग्रामस्थ हैराण
सचिन कांबळे
पंढरपूर : गुरसाळे (ता. माळशिरस) येथे पूर्वी स्थायिक असलेल्या एका व्यक्तीला पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी सर्वत्र पसरली अन् त्यांच्या नातेवाईकाचा फोन दिवसभर वाजू लागला. यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य अस्वस्थ झाले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
मांजरी (जि. पुणे) येथे माझ्या भावाचा मुलगा एका कार भाड्याने देणाºया कंपनीमध्ये चालक म्हणून काम करतो. त्या ठिकाणी त्याच्या इतरही गाड्या आहेत.
कोणत्यातरी कारणाने त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजते. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी त्याच्या मुलाचे व पत्नीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचा अहवाल संध्याकाळी कळणार असल्याचे सांगण्यात आले. तो प्रत्येक वर्षी त्याच्या कुटुंबीयांसह गावच्या यात्रेसाठी गुरसाळे येथे येतो. मात्र गेल्या एक वर्षांपासून तो गावाकडे आला नाही. पुढच्या महिन्यात सणानिमित्त येणार होता.
त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी प्रसिद्ध होताच, आमच्या घरामधील सदस्यांना विविध स्तरातील लोकांचे फोन येत आहेत. त्याची तब्येत ठीक आहे का? तो बरा आहे का? याबाबत उत्तरे देऊन आम्ही परेशान झालो आहे. वास्तविक पाहता आम्ही त्याला पाहण्यासाठी गेलो नाही. कारण त्याला भेटण्यासाठी सोडतच नाहीत. फक्त मोबाईलवरून त्याच्या आरोग्याबाबत विचारपूस सुरू आहे.
यामुळे आम्हाला गावकºयांकडून कसलाही त्रास होत नाही. परंतु गावातील लोक त्रास देत असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितले.
आरोग्य सेवकाकडून पाहणी
- गुरसाळे (ता. माळशिरस) येथील एका कुटुंबातील सदस्याला पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी समजताच वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनेने आरोग्य सेवक बी. डी. कांबळे यांनी संबंधित कुटुंबाची, त्याच्या घराची पाहणी केली. परंतु त्या ठिकाणी सर्व व्यवस्थित असल्याचे त्यांना आढळून आले.