अन् "त्या' गुरुजींवर आली ही वेळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 08:50 AM2020-03-06T08:50:13+5:302020-03-06T08:52:39+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी काय केले वाचा...!!!
सोलापूर: झेडपीच्या सात शिक्षकांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या शिक्षकांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पपरमेश्वर राऊत यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी बोगस पदव्या सादर करुन पदोन्नती घेतल्याचा विषय चांगलाच गाजला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत पंधरा कर्मचाऱ्यांनी असे बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचे चौकशीत उघड झाल्याचे कार्यकारी अभियंता कदम यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले आहेत. चौकशी समिती या प्रकरणाची अजून चौकशी करीत आहे. विधानसभेपर्यंत हे प्रकरण गेलेले असतानाच आता शिक्षकांच्या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र हा विषय पुन्हा चर्चेला आलेला आहे. सात शिक्षकांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार आहे. या तक्रारीची विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून,या शिक्षकांची विभागीय चौकशी लावली आहे. त्यामुळे या शिक्षकांना चौकशीला सामोरे जावे लागत असून यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे राऊत यांनी सांगितले. शिक्षकांनीच असे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे जिल्हा परिषदेत हा विषय चर्चेचा ठरला आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी
दोन कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र ही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे दिव्यांग प्रमाणपत्र देऊन पदोन्नती घेतलेल्यांनी हे प्रमाणपत्र बेरा टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. दोन कर्मचाऱ्यांनी अशी टेस्ट करून प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचीही चौकशी लागली आहे.