आणि पैसा झाला मोठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:58 PM2019-09-18T12:58:55+5:302019-09-18T12:59:06+5:30
एकदा एका व्यक्तीस दोन महिला भेटल्या, त्या व्यक्तीने त्या महिलांना त्यांचे नाव विचारले. थोडी ओळख झाल्याने त्यांनी त्यांना नाव ...
एकदा एका व्यक्तीस दोन महिला भेटल्या, त्या व्यक्तीने त्या महिलांना त्यांचे नाव विचारले. थोडी ओळख झाल्याने त्यांनी त्यांना नाव सांगायचे ठरविले. एक म्हणाली मी लक्ष्मी, म्हणजे धन तर दुसरी म्हणाली मी दारिद्र्य. हे ऐकून व्यक्ती चकितच झाला. त्याला प्रश्न केला गेला की, आमच्यापैकी कोण जास्त सुंदर आहे आणि तुला हवेसे वाटते. क्षणभर तो विचार करू लागला, त्याने त्या दोघींना थोडे लांब जायला सांगितले. वीस-पंचवीस फूट जाऊन आल्या आणि पुन्हा तोच प्रश्न !
शेवटी तो व्यक्ती म्हणाला, मी दोघींनाही नाराज करू शकत नाही. तेव्हा लक्ष्मी येताना छान वाटत होती, तर दारिद्र्य जाताना छान वाटत होती. हे सांगण्यामागचा उद्देश असा की, आपण विविध नकारात्मक गोष्टींनी वेढलो आहे असे आपणास वाटते, परंतु त्याच नकारात्मक गोष्टी सकारात्मक करता येतात.
आज पैसा मोठा झाला आहे. जगण्यासाठी क्षणोक्षणी पैशाची गरज भासत आहे, परंतु कमवलेला पैसा आणि कष्टाचे धन यातील अंतर जाणता आले पाहिजे. माणूस असा एकच या पृथ्वीतलावर आहे की जो पैशाशिवाय जगू शकत नाही. या जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भूक आहे हे विसरून चालणार नाही.
संघर्षमय जीवनात धन महत्त्वाचे आहे खरे पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आहेत, ज्या पैशाविना भोगता येतात. जगायला पैसा कमी पडत आहे. एक-एक रुपयासाठी माणसाची संघर्षमय यातना देवाला कळत आहे, परंतु शेतकरी असो वा कामगार वा व्यापारी घाम गाळणारा प्रत्येक व्यक्ती पैशासाठी संघर्ष करत आहे.
पैसा कमवावा तो कोणत्या मार्गाने हेही सद्बुद्धीवाल्यांना कळते की नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे. आज मंदी इतकी वाढली आहे की, रोजच्या जीवनाची गाडी उद्या धावेल की नाही असे वाटत आहे.
म्हणूनच आत्महत्या, गुन्हेगारी, लूटमार वाढत आहे. आज पैशामुळे नाती दुरावत आहेत. याला कोण जबाबदार ? जगण्यास लागणारा पैसा आणि मनातील नाती यात फरक पडला आहे. पैसा नात्याहून जड झाला आहे का ? असा प्रश्न उद्भवत आहे.
मंदीच्या लाटेत अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत, अशाप्रसंगी संयम ठेवा म्हटलं जातं, परंतु सत्य परिस्थिती हाताळणे सोपे राहिले नाही.
व्यवहार स्वच्छ उरत नाही, असे चित्र समाज अनुभवत आहे. पैशामागची कोणाची तळमळ घेऊ नये असे वाटते आहे. त्या भूकंप, महाप्रलय, पूर अशा नैसर्गिक आपत्तीची कमी नाही. निसर्गही रागावला आहे, असे वाटते. सर्व नुकसान झाले असताना पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान मानवासमोर आहे, तेही पैशाविना. तेवढेच घ्यावे, जेवढे हातात मावेल, कधी दान देऊन सुद्धा पहावे, पैशाचे दान न करता गरजा भागविणाºया वस्तू, अन्न, वस्त्र इतर गोष्टी देऊन पहावे. मनाला जो आनंद मिळतो तो पैसा, धन कमविण्यासाठी प्रेरणा ठरेल.
पैसा मोठा झाला तरी काही गोष्टी पैसा खरेदी करू शकत नाही. लहान मुलाचे हसणे, निसर्ग, पाऊस, वारा. जवळील लोक खूप आनंद देऊन जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम, नि:स्वार्थी प्रेमाला पैशाची जोड नाही ! आपला आनंद कशात आहे, ते शोधा. पैसा तर प्रत्येकजण कमवतो, पूर्वी पैसा महत्त्वाचा वाटत नव्हता. परंतु, याला आपणच मोठे केले आहे. जगण्यास पैसा, अडका लागतो खरा पण ते सर्वस्व नाही.
जगातील प्रत्येक व्यक्तीला पैसा लागत आहे, असे वाटते खरे. परंतु, काही लोक खूश राहायला प्राधान्य देतात. आज तुम्हाला ठरवायचं आहे की धन मोठे की स्वत:चा आनंद. काही लोक सहमत नसतील ही खरे या विचारांशी. परंतु, पैशाची परिस्थिती अशीच आहे. जगायला पैसा आणि पैशाने जग चालले आहे, पण कोणत्याही व्यक्तीने आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले आहे, त्यात धनाची काय भूमिका आहे हे ठरवावे. या सर्व गोष्टीवरून असे वाटते की, पैसा मोठा झाला आहे.
- ऋत्विज चव्हाण
(लेखक अर्थविषक अभ्यासक आहेत)