अन् पोलीस बंदोबस्त वाढविला
By admin | Published: May 17, 2014 12:44 AM2014-05-17T00:44:52+5:302014-05-17T00:44:52+5:30
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यावर पोलिसांनी अचानकपणे बंदोबस्तात वाढ केली.
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यावर पोलिसांनी अचानकपणे बंदोबस्तात वाढ केली. निकालानंतर कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. रामवाडी गोदामावर शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांनी आघाडी घेतली. निकालाचे वृत्त व्हॉटस्अप, रेडिओवरून बाहेर येऊ लागल्यावर भाजप, सेना कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. दुपारी बारानंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर मोदी, सात रस्ता, विजापूर वेस, पांजरापोळ चौक आदी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्यानंतर रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. काँग्रेसभवन येथे शुकशुकाट जाणवत होता. कुमठा नाका येथे वैयक्तिक भांडणातून दगडफेक झाल्याचे वृत्त येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुक्तालयात कमांडो व स्ट्रायकिंंग फोर्स राखीव ठेवण्यात आला होता, तर मोदी गेटजवळ पोलिसांनी नाकेबंदी केली होती. या ठिकाणी वरुण वाहनासह पोलीस सज्ज होते. या ठिकाणी ध्वनिक्षेपकावर निकाल ऐकण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे याठिकाणी माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर वायरलेसवर सूचना देत होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची शहरात फिरती गस्त होती. माढा मतदारसंघातील लढत चुरशीची झाली होती. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचविणारी ठरली. सुरुवातीला पिछाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शेवटच्या काही फेर्यात आघाडी घेतली. अकलूज येथे खुद्द पोलीस अधीक्षक मकरंद रानडे ठाण मांडून होते. नियंत्रण कक्षात विशेष पथक राखीव ठेवण्यात आले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी अकलूजला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर दुपारनंतर ते सोलापुरात दाखल झाले. निकालानंतर जल्लोष शांततेत पार पडल्यावर ते कोल्हापूरकडे रवाना झाले.