...आणि ती आत्महत्येपासून परावृत्त झाली!, मुख्यमंत्र्यांनी घेतली एसएमएसची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:27 AM2018-03-31T05:27:21+5:302018-03-31T05:27:21+5:30
पतीकडून पोटगी मिळत नसल्याने नई जिंदगी परिसरातील एका महिलेने मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.
अमित सोमवंशी
सोलापूर : पतीकडून पोटगी मिळत नसल्याने नई जिंदगी परिसरातील एका महिलेने मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तत्काळ दखल घेऊन तो एसएमएस पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना पाठविला. यावर तातडीने कार्यवाही करीत एमआयडीसी पोलिसांनी तिचे समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.
विड्या वळण्याचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेला महिना १२०० रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. परंतु अनेक वर्षांपासून तिला पोटगी मिळालेलीच नाही. त्यापोटीचे थकीत १ लाख ३ हजार रुपये मिळावेत, अशी तिची मागणी होती. त्यातूनच त्रस्त होत तिने मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविला.
पोलीस निरीक्षक कमलाकार पाटील, भाग्यश्री जाधव यांनी पोटगी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन महिलेचे समुपदेशन केले. शताब्दी ग्रुपचे अध्यक्ष रसूल पठाण यांनी दोन महिन्यांचा किराणा देण्याचे जाहीर केले.
असा होता एसएमएस
मला पाच वर्षांचा मुलगा आहे. नवºयाने तलाक दिला आहे. पण पोटगी लागू होऊनही तो देत नाही. मी उपाशी राहू शकते; पण मुलाला का उपाशी ठेवू? त्याचा काय दोष? विड्या वळून महिन्याला ८०० ते १००० रुपये मिळतात. ते पण घरभाडे भरते. कसे पोट भरू सांगा? या नैराश्येतून मी आत्महत्या करीत आहे. काय करू मी मुख्यमंत्री सर तुम्हीच सांगा? कायद्यावर विश्वास ठेवून इतकी वर्षे गप्प राहिले; पण आता उपासमारीमुळे माझी सहनशक्ती संपल्यामुळे मी माझ्या मुलाबरोबर आत्महत्या करत आहे.