अन्...सोलापुरच्या महापौर ढसाढसा रडल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:19 PM2018-11-20T13:19:37+5:302018-11-20T13:24:34+5:30
महागावकर-बनशेट्टींनी विष पाजलं, सुरेश पाटलांचा गौप्यस्फोट : कामाटी, कोठे अन् निंबर्गी यांचीही नावे जबाबात
सोलापूर : महापालिकेतील राजकीय घडामोडींचा राग मनात धरून महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, भाजपा शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी आणि नगरसेवक सुनील कामाटी यांनी माझ्यावर विष प्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यानंतर आपली प्रतिक्रिया देताना महापौर शोभा बनशेट्टी या ढसाढसा रडल्या. त्या भावुक झाल्या.
या सर्वांना तत्काळ अटक करावी अन्यथा बुधवारपासून कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसोबत चक्री उपोषण करु, असा इशाराही त्यांनी दिला. थेलियम विषबाधा प्रकरणी सुरेश पाटील यांनी संशयितांची नावे असलेला जबाब शनिवारी पोलिसांना दिला होता. घोंगडे वस्ती येथील निवासस्थानी त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. पाटील म्हणाले, मी मोठा होऊ नये म्हणून या पाच लोकांनी संगनमताने माझ्याविरुद्ध कट रचला. यांनीच माझ्या जेवणात विष घातले किंवा घालायला लावले, असा माझा संशय आहे. त्यांच्याविरुद्ध मी पोलिसांत तक्रार दिली आहे. अजूनही माझ्या जीवाला धोका आहे असेही सुरेश पाटील यांनी सांगितले़