अन् सोलापूरचे पोलिस झाले अवाक्; प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसमध्ये सापडला गुटखा
By Appasaheb.patil | Published: September 28, 2022 05:18 PM2022-09-28T17:18:34+5:302022-09-28T17:26:41+5:30
सोलापूर राज्य परिवहन महामंडळ (एस-टी) बसस्थानकातील मोठी घटना
सोलापूर : महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा कर्नाटकातून पोत्याने होलसेल दरात आणून नाशिकमध्ये फेरीने पानटपरी चालकांना विक्री करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांनी मंगळवारी (ता. २७) रात्री उशिरा एसटी स्टँडवर पकडले.
राज्यात गुटखा बंदीला दहा वर्षे पूर्ण होऊनही सर्रासपणे सर्वच जिल्ह्यांत गुटखा, मावा, सुगंधी तंबाखूची विक्री केली जात आहे. शेजारील राज्यात गुटख्यावर बंदी नसल्याने अनेकजण कर्नाटकातून अवैध पद्धतीने पोत्याने गुटखा घेऊन येतात. काहीवेळा दुचाकीवर तर आता चक्क कर्नाटक एसटीतूनच गुटख्याची तीन पोती आणल्याचे समोर आले आहे. सोलापूर एसटी स्टँडवर गुटख्याची पोती उतरवून नाशिक एसटीतून जाण्याच्या तयारीत असलेल्या त्या तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. आज बुधवार २८ सप्टेंबर २०२२ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात तो गुटखा देण्यात आला. या प्रकरणाचा सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे तपास करीत आहेत.