३५ दिवसांनंतरही अंगणवाड्यांना कुलूपच, संपकरी सेविका अन् मदतनिसांना नोटीसा
By दिपक दुपारगुडे | Published: January 10, 2024 05:50 PM2024-01-10T17:50:24+5:302024-01-10T17:51:36+5:30
नवीन कर्मचाऱ्यांना एक वर्षाच्या आत संपामध्ये सहभागी होता येत नसल्याचे संकेत आहेत.
सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या मागण्यासाठी संपाचा एल्गार पुकारल्याने गेली ३५ दिवस अंगणवाड्या कुलूपबंद आहेत. परिणामी बालके तथा लाभार्थी आहारापासून वंचित राहत असून लसीकरण सेवाही बंद असल्याने येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाने २०१ सेविका व १९३ मदतनीस, मिनी अंगणवाडीतील ५० महिला कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून तत्काळ कामावर उपस्थित राहावे, अन्यथा आपणास मानधनी सेवेतून कमी करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
तालुक्यातील सर्व सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांनी मानधनात वाढ, पेन्शन, ग्रॅज्युएटी व अन्य मागण्यांसाठी दि. ४ डिसेंबर २०२३ पासून संपाचा एल्गार पुकारला आहे. या संपाला ३५ दिवस पूर्ण झाल्याने अंगणवाडीतील लहान बालके पोषण आहार, पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य तपासणी व मूलभूत सेवांपासून वंचित राहत असल्याने वरील सेविका व मदतनिसांना एकात्मिक बालविकास सेवा योजन कार्यालयाकडून नोटीस बजावली आहे. यामध्ये अंगणवाडी इमारती शासकीय मालमत्ता असल्यामुळे तिच्यावर नियंत्रण ग्रामपंचायतीचे आहे.
बालकांचे कुपोषण वाढण्याची भिती
मागील एक महिन्यापासून अंगणवाडी बंद असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होऊन बालकांचे कुपोषण वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे पूरक पोषण आहारामध्ये खंड पडू नये यासाठी आपण तत्काळ अंगणवाडी केंद्रात हजर होऊन कामकाज करावे, अन्यथा दि. १२ एप्रिल २००७ च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडीच्या कामकाजावर विनापरवाना गैरहजर राहिल्यामुळे आपणास मानधनी सेवेतून कमी करण्यात येईल, असे दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, मिनी अंगणवाडीमधील ३ महिला कर्मचारी, ३ सेविका, १४ मदतनीस कामावर हजर झाल्या असल्याचे सांगण्यात आले. नवीन २७ सेविका व मदतनिसांपैकी १४ हजर झाल्या आहेत. नवीन कर्मचाऱ्यांना एक वर्षाच्या आत संपामध्ये सहभागी होता येत नसल्याचे संकेत आहेत.