इंग्रजीतून माहिती भरता येईना सोलापुरातील अंगणवाडीताईंनी मोबाईल केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 05:35 PM2021-08-24T17:35:45+5:302021-08-24T17:35:51+5:30
१६४ जणींचा एल्गार: हँडसेट बदलून मराठी ॲप देण्याची मागणी
सोलापूर : वारंवार हँग होणारे जुने हँडसेट अशात पोषण ट्रॅकरवर इंग्रजीतून माहिती भरता येईना म्हणून वैतागलेल्या शहरी अंगणवाडीतील १६४ अंगणवाडी सेविकांनी सोमवारी सुपर मार्केट येथील कार्यालयात धाव घेऊन हँडसेट जमा केले.
अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाजाची नोंद ऑनलाईन अपडेट करण्यासाठी सन २०१९मध्ये मोबाईल हँडसेट देण्यात आले आहेत. यासाठी केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर ॲप दिला असून, यावर सेविकांना दररोज लाभार्थींचे नाव, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती महिला, पोषण आहार वाटपाची माहिती भरायची आहे. माहिती भरण्याचे काम इंग्रजीतून असल्याने कमी शिक्षण असलेल्या सेविकांना अडचणीचे ठरत आहे. याशिवाय मोबाईल दोन वर्षाचे जुने झाल्याने रॅम स्लो असून, वापर करताना गरम होतात. बऱ्याचदा मोबाईल हँग झाल्याने माहिती भरता येत नाही. त्यामुळे सेविकांना दररोज वरिष्ठांची बोलणी खावी लागत आहेत. हँडसेट बदलून मराठी ॲप द्यावे, अशी मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
त्यामुळे वैतागलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी शहरी अंगणवाडी विभागाच्या सुपर मार्केटमधील कार्यालयात धाव घेतली. १६४ जणांनी आपले हँडसेट कार्यालयात परत केले. यावेळी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, सरला चाबुकस्वार, कांचन पांढरे उपस्थित हाेते.
सर्व हँडसेट परत करणार
- ग्रामीणमध्ये ४ हजार २११, तर शहरी भागात ५१९ अंगणवाड्या आहेत. अशा ४ हजार ७३३ सेविकांकडे व १५१ मुख्य सेविकांकडे मोबाईल हँडसेट आहेत. यातील ॲपमध्ये डिलीटचा पर्याय नाही, वर्गवारी, लाभार्थी गट बदलता येत नाही, ॲपवर काम करणे किचकट असल्याने जिल्ह्यातील सर्व सेविका हा मोबाईल शासन जमा करणार असल्याचे संघटनेचे सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.
- शासनाच्या मोबाईलवर इंग्रजीतून माहिती भरता येत नसल्याने वैतागलेल्या अंगणवाडीताईंनी शहरी आरोग्य केंद्राच्या सुपर मार्केट येथील कार्यालयात जाऊन निदर्शने करीत हँडसेट जमा केले.